केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आणि पक्षबांधणीसाठी काँग्रेस सक्रिय झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने ‘भारत जोडो यात्रा’ मोहिम सुरू केली आहे. त्या पदयात्रेचा प्रारंभ राहुल गांधी यांच्या नेतृत्वात बुधवारी ( ७ सप्टेंबर ) कन्याकुमारी येथून झाला. यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी ३५७० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. मात्र, आता यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी परिधान केलेल्या टी-शर्टवरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

राहुल गांधी नेहमी कुर्ता आणि पायजम्यामध्ये सर्वांना दिसतात. पण, भारत जोडो यात्रेच्या प्रवासावेळी त्यांनी टी-शर्ट आणि पँट घातली आहे. त्यांनी घातलेल्या टी-शर्टच्या किंमतीवरून भाजपाने राहुल गांधींवर टीका केली आहे. भाजपाने याबाबत ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी ब्रिटिश लग्जरी कंपनीच्या ब्रँडचा बर्बेरी हा पांढरा टी-शर्ट घातला आहे. त्याची किंमत ४१ हजार २५७ रुपये असल्याचं सांगितलं आहे. तसेच, ‘भारत देखो’ असे कॅप्शनही त्यावर लिहलं आहे. या ट्विटमुळे राहुल गांधी यांच्या परिधान केलेल्या कपड्यांच्या किंमतींची चर्चा होत आहेत.

“मोदींचा १० लाख रुपयांचा सूट…”

भाजपाने राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या ट्विटला काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुटबद्दल चर्चा करायची का? असं आव्हान दिलं आहे. काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “भारत जोडो यात्रेला नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याचे पाहून घाबरला काय. बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्यावर चर्चा करा. बाकी कपड्यांवर चर्चा करायची झाली, तर मोदींचा १० लाख रुपयांचा सुट आणि १.५ लाख रुपयांच्या चष्म्यापर्यंत गोष्ट जाईल,” असं सडेतोड उत्तर काँग्रेसने दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी काँग्रेसचा अध्यक्ष होणार की नाही…”

भारत जोडो यात्रेचा दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अध्यपदाच्या शर्यतीतून बाहेर नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “मी काँग्रेसचा अध्यक्ष होणार की नाही, हे निवडणुका झाल्यावर स्पष्ट होईल. मला काय करायचं आहे, ते मी ठरवलं आहे. त्याबाबत कोणताही गोंधळ नाही,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.