भारतीय लोक हे वर्णभेदी किंवा वंशभेदी नाहीत हा मुद्दा पटवून देताना भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार तरुण विजय यांनी दाक्षिणात्य लोकांना भिन्न वंशाचे म्हटले. त्यावरुन वादाला तोंड फुटले आहे. हा वाद मिटवण्यासाठी त्यांनी सारवासारव केली परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. एका इंग्रजी वाहिनीवर भारतामध्ये अफ्रिकन देशामधील तरुणांवर भारतात हल्ले का होत आहेत यावरुन चर्चासत्र होत होते. त्यावेळी महेश शांताराम या छायाचित्रकाराने एक मुद्दा उपस्थित केला. भारतामध्ये वंशभेद नाही असे नेते ठासून म्हणतात परंतु बाहेरील देशातून येणाऱ्यांना मात्र येथे वंशभेद जाणवतो. ते सर्व लोक चूक आहेत का असा प्रश्न त्यांनी विचारला.

त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना तरुण विजय म्हणाले. जर भारतीय लोक वंशभेद करणारे असते तर ते दाक्षिणात्य लोकांसोबत गुण्यागोविंदाने का राहिले? आमच्या देशामध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश ही राज्ये आहेत, देशात सर्व ठिकाणी काळे लोक राहतात. परंतु या सर्व लोकांसोबत आम्ही गुण्यागोविंदाने राहतो असे तरुण विजय म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. टीका झाल्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले आम्ही कृष्णाची उपासना करतो. कृष्णाचा शब्दार्थ काळा असाच आहे. भारतीय कधीच वंशभेद करत नाही उलट भारतीयच ब्रिटिशांनी केलेल्या वंशभेदाचे बळी ठरले आहे असे ते म्हणाले.

देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या रंगाचे लोक राहतात परंतु येथे कुणी त्यांच्याबद्दल खराब वर्तन करत नाहीत असे ते म्हणाले. आपल्या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी देखील मागितली आहे. जर माझ्या बोलण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला माफ करा असे देखील ते म्हणाले. भारतामध्ये अफ्रिकन नागरिकांवर हल्ले झाल्यामुळे अफ्रिकन देशांनी या घटनांचा निषेध व्यक्त केला आहे. हा मुद्दा घेऊन आम्ही संयुक्त राष्ट्रामध्ये जाऊ असे देखील त्यांनी म्हटले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी याबाबत अफ्रिकन देशांमध्ये राजदूतांसोबत चर्चा केली. आम्ही या प्रकाराचे गांभीर्याने दखल घेतली असून अफ्रिकन नागरिकांना सुरक्षित वातावरण दिले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.