BJP on Shahid Afridi Comment: भारताकडून आशिया चषकात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता पाकिस्तानचा जळफळाट समोर येत आहे. पाकिस्तानचे माजी खेळाडू एकामागोमाग भारताविरोधात गरळ ओकत आहेत. यात पुन्हा एकदा शाहिद आफ्रिदीचे विधान चर्चेत आले आहे. शाहिद आफ्रिदीने यापूर्वीही भारताविरोधात विधाने केली आहेत. मात्र यावेळी त्याने राहुल गांधींची स्तुती करत भारत सरकारला लक्ष्य केले. यामुळे आता भाजपाकडूनही राहुल गांधीवर टीका करण्यात येत आहे.
शाहिद आफ्रिदी काय म्हणाला?
पाकिस्तानच्या समा वृत्तवाहिनीवरील चर्चेत सहभागी झालेला असताना आफ्रिदीने भारताविरोधात विधान केले. याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. यात आफ्रिदी म्हणतो, “स्वतःला सत्तेत ठेवण्यासाठी भारतातील विद्यमान सरकारकडून वारंवार धार्मिक मुद्दे पुढे केले जातात. ही खूप वाईट विचारसरणी आहे. यांचे सरकार जोपर्यंत आहे, तोपर्यंत अशीच विचारसरणी राहणार.”
राहुल गांधींचे केले कौतुक
शाहिद आफ्रिदीने विद्यमान केंद्र सरकारवर टीका करत असताना राहुल गांधी चांगले असल्याचे म्हटले. तो म्हणाला, “भारतात सर्वच वाईट आहेत, असे नाही. राहुल गांधींसारखे काही चांगले लोकही आहेत. राहुल गांधी सकारात्मक विचारांचे असून संवादाच्या माध्यमातून ते जगाबरोबर एकत्र येऊ इच्छितात. पण यांच्या लोकांनी सुधारायला हवे. एक इस्रायल पुरेसा नाही का? की तुम्ही दुसरा इस्रायल बनू पाहत आहात?”

भाजपाची राहुल गांधींवर टीका
शाहिद आफ्रिदीने राहुल गांधींची स्तुती करताच भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे. तसेच त्यांचे आणि पाकिस्तानचे जुने मैत्र असल्याचे म्हटले. भाजपाचे प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “भारताचा द्वेष करणाऱ्या प्रत्येकाला राहुल गांधी आणि काँग्रेस जवळचे वाटतात. सोरोस पासून ते शाहिद आफ्रिदीपर्यंतचे उदाहरण देता येतील.”
शेहजाद पुनावाला यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसच्या आयएनसीचा फुल फॉर्म इस्लामाबाद नॅशनल काँग्रेस असल्याचेही म्हटले. तसेच काँग्रेस आणि पाकिस्तान यांच्यात जुनी मैत्री असून कलम ३७० पासून सर्जिकल स्ट्राईक आणि २६/११ च्या दोषींना क्लीन चीट.. अशा अनेक विषयांत काँग्रेसने पाकिस्तानची री ओढलेली आहे, असेही ते म्हणाले.