चंडीगड : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले असताना मंगळवारी संध्याकाळी हरियाणातील सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला. तेथील तीन अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री नायब सिंह सैनी सरकारचा पाठिंबा काढून घेत काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजप सरकार अल्पमतात आले आहे.

सोंबीर सांगवान (दादरी), रणधीर गोलेन (पुंद्री) आणि धरमपाल गोंडर (निलोखेरी) या तीन अपक्ष आमदारांनी अचानक काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष उदय भान यांच्या उपस्थितीत रोहतक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत या तिन्ही अपक्षांनी काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अपक्षांच्या पाठिंब्यावर असलेले भाजप सरकार डळमळीत झाले आहे.

हेही वाचा >>> “राम मंदिर निरुपयोगी”, समाजवादी पक्षाच्या नेत्याचं वादग्रस्त विधान; योगी आदित्यनाथ म्हणाले…

मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांच्या सरकारने राजीनामा द्यावा. हरियाणात राष्ट्रपती राजवट लागू करून निवडणूक जाहीर करावी. हे सरकार लोकविरोधी आहे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते भूपिंदरसिंह हुडा यांनी केली. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदय भान म्हणाले की तीन अपक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. भाजप सरकारला आधी जेजेपीचे १० आमदार आणि अपक्षांचा पाठिंबा होता. परंतु जेजेपीनेही पाठिंबा काढून होता… आणि आता अपक्षांनीही भाजपची साथ सोडली आहे. त्यामुळे सैनी सरकार अल्पमतात आले असून त्याला एक मिनिटही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभेतील संख्याबळ

एकूण ९० सदस्यांच्या हरियाणा विधानसभेत सध्या ८८ आमदार आहेत. त्यात भाजपचे संख्याबळ ४० असून काँग्रेसचे ३० आणि जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) १० सदस्य आहेत. ‘जेजेपी’ने मार्चमध्येच भाजपची साथ सोडली. आता तीन अपक्षांनी पाठिंबा काढून घेतल्याने भाजपला बहुमतासाठी दोन सदस्य कमी पडत आहेत. राज्यात येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होणे अपेक्षित आहे.