नवी दिल्ली/ मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातून एकाही उमेदवाराची घोषणा केली नसली तरी या आठवडय़ामध्ये पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या दुसऱ्या बैठकीनंतर भाजपचे खासदार असलेल्या २३ जागांवर उमेदवार जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, महायुतीतील मित्रपक्षांनीही अधिक जागा पदरात पाडण्यासाठी दबावतंत्र सुरू केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गतवेळेप्रमाणे २२ जागा लढण्याची ठाम भूमिका जाहीर केली असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही १६ जागांसाठी आग्रह केला जात आहे.

  भाजपने गेल्या आठवडय़ामध्ये १९५ उमेदवारांची यादी जाहीर करताना उत्तर प्रदेश वगळता ‘एनडीए’तील आघाडय़ा असलेल्या अन्य राज्यांतील  उमेदवार जाहीर करणे टाळले होते. यात महाराष्ट्राचाही समावेश होता. उर्वरित सुमारे अडीचशे जागांमध्ये महाराष्ट्र हेच सर्वात मोठे राज्य असल्याने दुसऱ्या टप्प्यातील यादीमध्ये महाराष्ट्रातील जागांवर उमेदवार जाहीर केले जाऊ शकतात. गेल्या वेळी भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या, त्या जागांवर भाजपचाच दावा असून या आठवडय़ात होणाऱ्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये तेथील उमेदवारांवर शिक्कामोर्तब होऊ शकेल, असे सांगितले जाते. भाजप राज्यात ३० हून अधिक जागा लढवण्याची शक्यता व्यक्त होत असून तिढा असलेल्या जागा वगळून उर्वरित जागांवर उमेदवारांची घोषणा केली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

ncp sharad pawar faction
आयात उमेदवारांवर राष्ट्रवादीची मदार
Dindori, Sharad Pawar
दिंडोरीतून मार्क्सवाद्यांच्या माघारीने शरद पवार गटाला बळ
अजितदादांच्या चिरंजीवाने निवडणूक लढविलेल्या मावळातून ‘घड्याळ’ हद्दपार !
NCP won seven seats in the Lok Sabha elections 2024 Pune news
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सात जागा? बैठकीत चर्चा काय झाली?

हेही वाचा >>>नड्डाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात? राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा

भाजपच्या वाटणीनंतर आपल्या वाटय़ाला अधिक जागा याव्यात यासाठी शिंदे गट आणि अजित पवार गटाने दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. ‘शिवसेनेने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २२ जागा लढल्या होत्या, तेवढय़ाच जागा या निवडणुकीतही आम्हाला मिळाव्यात, यासाठी आम्ही आग्रही आहोत,’ असे शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, अजित पवार गटाने गेले दोन दिवस राज्यातील १६ जागांचा आढावा घेऊन आपण त्यासाठी आग्रही असल्याचे संकेत दिले आहेत. या काही ठिकाणी भाजप-शिंदे गटाचे खासदार आहेत.

अजित पवार गटाला हव्या असलेल्या जागा

गोंदिया-भंडारा, नाशिक, दिंडोरी, ईशान्य मुंबई, हिंगोली, धाराशिव(उस्मानाबाद), रायगड, कोल्हापूर, बुलढाणा, माढा, सातारा, शिरूर, बारामती, परभणी, अहमदनगर , गडचिरोली या जागांसाठी अजित पवार गट आग्रही आहे.  सत्तेत सहभागी होण्यापूर्वी अजित पवार यांना भाजपकडून १६ जागा देण्याचे आश्वासन दिल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगितले जात आहे.

अमित शहा तिढा सोडवणार?

महायुतीतील तिढय़ावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय नेत्यांच्या स्तरावर अजून चर्चा देखील झालेली नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी, ५ मार्च रोजी राज्याच्या दौऱ्यावर असून अकोला, जळगाव, संभाजीनगर या तीन शहरांमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. शहांच्या महाराष्ट्रातील दौऱ्यानंतर तिढा सोडवण्याला प्रयत्नांना वेग येऊ शकेल, असे समजते.

‘दहा दिवसांत निर्णय’

‘महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय अद्याप झाला नाही. सर्व घटक पक्षांशी चर्चा करून आठ-दहा दिवसांत निर्णय घेतला जाईल,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपूर येथे स्पष्ट केले. भाजयुमोच्या कार्यक्रमानिमित्त नागपूर येथे आले असताना विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या आमच्या सहयोगी सदस्य असल्यामुळे भाजयुमोच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या, असेही फडणवीस म्हणाले.