हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह बेताल वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांची खरडपट्टी काढण्यास अवघे दोन दिवस उलटल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी वल्लभगडमध्ये झालेल्या दलित कुटुंबीयांच्या जळीतकांडप्रकरणी अकलेचे तारे तोडले आहेत. ‘रस्त्यावर कुत्र्याला कुणी दगड फेकून मारला तरी त्याची जबाबदारी सरकारवर असेल का,’ असा प्रश्न सिंह यांनी विचारला होता. बिहारमध्ये आरक्षणाच्या मुद्यावर स्पष्टीकरण देताना भाजपची पुरती दमछाक झालेली असताना आता सिंह यांनी भाजपला तोंडघशी पाडले आहे. बिहारमध्ये राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपला दलितविरोधी ठरविले आहे.

सिंह यांच्या वक्तव्यानंतर बिहार भाजपमध्ये खळबळ माजली आहे. त्यांच्या वक्तव्यावर बिहार भाजप नेत्यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे नाराजी व्यक्त करून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी विनंती केल्याचा दावा पक्षसूत्रांनी केला. त्यानंतर शहा यांच्या सूचनेवरूनच सिंह यांनी स्पष्टीकरण दिल्याची चर्चा भाजप मुख्यालयात सुरू होती.
गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये जणू काही वाचाळवीरांची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यात सिंह यांनी आज भर घातली. त्यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख रणदीप सुर्जेवाला म्हणाले की, केंद्रीय मंत्र्यांचे हे वक्तव्य भाजपच्या दलितविरोधी मानसिकेतेचे प्रतीक आहे. सिंह यांचे विधान दलितांना हीन लेखणारे आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक केंद्रीय मंत्री घटनाविरोधी वक्तव्ये करीत आहेत. सिंह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी.

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी केली. केजरीवाल यानंी ट्विटरवरून सिंह यांच्याविरोधात मोहीम उघडली. सिंह यांचे विधान अनुसूचित जाती-जमातीच्याच्या विरोधात आहे. त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा सिंह यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याची घोषणा आपने केली आहे. सिंह यांनी वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण देताना स्वत: माजी लष्करप्रमुख असल्याची आठवण करून दिली असली तरी बिहार भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.