BJP leader Babban Singh Raghuvanshi Viral Video : उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते तथा बलियामधील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बब्बन सिंह रघुवंशी एका नर्तिकेबरोबर आक्षेपार्ह कृत्य करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने बब्बन सिंह यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

या व्हायरल व्हिडीओत दिसतंय की बब्बन सिंह एका वरातीवेळी नृत्य करणाऱ्या नर्तिकेबरोबर अश्लील कृत्य करत आहेत. हा व्हिडीओ २० दिवसांपूर्वीचा असला तरी तो आत्ता व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे बब्बन सिंह यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

बब्बन सिंह यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, या प्रकरणावर बब्बन सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “हा माझ्याविरोधातील कट आहे. माझी समाजातील, जनमानसातील प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने हे सगळं केलं जात आहे. एक महिन्यापूर्वी बलिया जिल्ह्यातील बान्सहीड येथे एका लग्नाच्या वरातीत मी सहभागी झालो होतो. बान्सडीह मतदारसंघाचे आमदार केतकी सिंह देखील या वरातीत माझ्याबरोबर होते. त्यांनीच माझ्याविरोधात हा कट रचला आहे.

रघुवंशी म्हणाले, उत्तर प्रदेश सरकारमधील परिवहन मंत्री दया शंकर सिंह त्यांचे नातेवाईक आहे. त्यांनी १९९३ मध्ये बान्सडीह मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. आगामी निवडणुकीत मला या मतदारसंघातून तिकीट मिळू शकतं. मी या जागेसाठी प्रबळ दावेदार आहे. त्यामुळेच माझ्याविरोधात हा कट रचण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला, समाजमाध्यमांवर बब्बन सिंह यांच्यावर बरीच टीका पाहायला मिळत आहे.