इंदूर : इंदूरमधील सीतला माता बाजारामध्ये वर्षानुवर्षे काम करणाऱ्या मुस्लिमांना निघून जाण्याचे आदेश भाजप नेत्याने दिले आहेत. या आर्थिक बहिष्काराविरोधात मुस्लीम समुदायाने केलेल्या तक्रारींची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. आमच्यावर बहिष्कार कसा काय टाकला जात आहे, असा प्रश्न काही दुकानदार विचारत आहेत.
शहर भाजपाध्यक्ष आणि चौथ्यांदा आमदार असलेल्या मालिनी गौर यांचा मुलगा एकलव्य गौर यांनी २५ ऑक्टोबरपर्यंत मुस्लिमांना सीतला माता बाजारपेठ सोडण्याचे फर्मान सोडले आहे. त्यामुळे अनेक कर्जबाजारी मुस्लीम दुकानदार फोनवरून मालाची विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. विक्रेते नवीन ठिकाणी नोकऱ्या शोधत आहेत आणि ग्राहकांचे उरलेले कपडे शिवून देण्यासाठी शिलाई कामगार वेळेशी शर्यत लावत आहेत.
या प्रकरणी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना एकलव्य गौर म्हणाले की, गेले दोन वर्षे या बाजारात जाणाऱ्या महिलांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आमदार मालिनी गौर यांच्याकडे आल्या होत्या. स्थानिक व्यापाऱ्यांच्या सांगण्यावरूनच मुस्लिमांना निघून जाण्याचा आदेश देण्यात आला, असा दावाही त्यांनी केला.
तक्रारींची चौकशी करण्यासाठी आम्ही पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. आम्ही निष्पक्ष पद्धतीने या तक्रारींची चौकशी करू.
आनंद कलादगी, पोलीस उपायुक्त
हिंदू दुकानदार मुस्लीम सहकाऱ्यांच्या पाठीशी एकलव्य गौर यांनी काढलेल्या आदेशाला अनेक हिंदू दुकानदारांनी विरोध केला आहे. काही दुकानदारांनी त्याविरोधात निदर्शनेही केली, तर काही भीतीने गप्प आहेत. विष्णू विजयवर्गीय या व्यापाऱ्याने सांगितले की, “आमचे चांगले कामगार, कुशल विक्रेते इथे अगदी लहानपणापासून आहेत. या बंदीमुळे त्यांच्या कुटुंबातील महिलांनीही येथे येणे बंद केले आहे.”