Kailash Vijayvargiya Comment: महिला क्रिकेट संघाचा विश्वचषक सध्या भारतात सुरू असून मध्य प्रदेशातील इंदूर येथे दोन दिवसांपूर्वी दोन ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा पाठलाग आणि विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली. महिला क्रिकेटपटू त्यांच्या हॉटेलमधून बाहेर पडून एका कॅफेकडे जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या एका व्यक्तीने त्यांचा पाठलाग सुरू केला व खजराना रोड परिसरात महिला क्रिकेटपटूचा विनयभंग करून तो पसार झाला. या घटनेवर मध्य प्रदेशचे नगरविकास आणि गृहनिर्माण तसेच संसदीय कामकाज मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी दिलेली प्रतिक्रिया वादात अडकली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेवर काँग्रेस आणि आदित्य ठाकरेंनी टीका केली.

काय म्हणाले कैलाश विजयवर्गीय?

इंधूरच्या घटनेवर स्थानिक माध्यमांशी बोलत असताना कैलाश विजयवर्गीय म्हणाले, “आम्ही बाहेर पडतो, तेव्हा स्थानिक यंत्रणेला याची माहिती देतो. याचप्रमाणे खेळाडूंनीही बाहेर पडण्यापूर्वी त्याची माहिती द्यावी. खेळाडूंना भविष्यात याची काळजी घ्यावी लागेल. ते जेव्हा जेव्हा बाहेर पडतील, तेव्हा त्याची माहिती स्थानिक यंत्रणेला द्यावी.”

कैलाश विजयवर्गीय यांनी खेळाडूंना काळजी घेण्याचे आवाहन करताना म्हटले, ज्याप्रमाणे इंग्लंडमध्ये फूटबॉलची क्रेझ असते, त्याप्रमाणे आपल्याइथे क्रिकेटचे वेड आहे. तिकडे फूटबॉलपटूंचे कपडे फाडल्याचे सर्वांनी पाहिले आहे. कधी कधी खेळाडूंना स्वतःच्या प्रसिद्धीचा अंदाज नसतो. खेळाडू लोकप्रिय असतात त्यामुळे बाहेर जाताना त्यांनी काळजी घ्यावी. इंदूरमधील प्रकार आपल्या सर्वांसाठीच आणि खेळाडूंसाठी एक धडा आहे.

काँग्रेसकडून होतेय टीका

काँग्रेसने कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानावर कडाडून टीका केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुण यादव म्हणाले, या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मध्यप्रदेश आणि भारताच्या प्रतिमेला डाग लागला आहे. बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणि प्रशासकीय व्यवस्थेतील कच्चे दुवे दुरूस्त करण्याऐवजी कैलाश विजयवर्गीय यांचे विधान त्यांची आणि सत्तेत बसलेल्यांची मानसिकता उघड करत आहे.

आदित्य ठाकरेंचीही टीका

कैलाश विजयवर्गीय यांच्या टिप्पणीवर शिवसेनेचे (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनीही टीका केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, इंदूर येथे ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंबरोबर घडलेली घटना लाजिरवाणी आहेच, त्याउपर मध्य प्रदेशच्या मंत्र्यांनी केलेले विधान अधिक लाजिरवाणे आहे.

रस्त्यावर फिरणे गुन्हा आहे का?

“सरकार या मंत्र्यावर कोणतीही कारवाई करणार नाही, हे उघड आहेच. पण आम्ही ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धा भारतात घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जगभरातील गुंतवणुकदारांना आकर्षित करत आहोत, अशावेळी सरकारमध्ये असलेल्या लोकांनी अशी मानसिकता दाखवणे लज्जास्पद आहे. एखादी महिला मग ती क्रिकेटपटू असो किंवा नसो, त्यांनी रस्त्यावर फिरणे गुन्हा आहे का? दररोज घडणाऱ्या अशा घटनांवर कडक कारवाई करण्याऐवजी मंत्री बेजबाबदार विधान करत आहेत. हे आपला समाज आणि शासन दोघांसाठी कलंक आहे”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

दरम्यान महिला क्रिकेटपटूंचा विनयभंग करणारा आरोपी अकील खान उर्फ नित्रा (२९) हा एक सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे.

प्रकरण काय आहे?

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन महिला संघ रॅडिसन हॉटेलमध्ये थांबला होता. जवळच असलेल्या एका कॅफेत ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला खेळाडू चालत जात होत्या. त्याचदरम्यान, आरोपी दुचाकीवरून तिथे आला आणि दोन्ही महिला क्रिकेटपटूंची छेड काढू लागला. तिथे असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या दुचाकीचा नंबर टिपला आणि दुसऱ्या एका कारचालकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली.