BJP minister Vijay Shah Remark : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मध्यप्रदेश सरकारचे मंत्री विजय शाह हे एका वादात सापडले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना शाह यांनी केलेले एक विधान सध्या चर्चेत आले असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाह भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असणार्‍यांना त्यांच्याच बहि‍णीच्या माध्यमातून धडा शिकवला असे म्हणताना ऐकू येत आहेत.

शाह यांनी यावेळी कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतलेले नाही, मात्र काँग्रेसने ते कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलत होते असा आरोप केला आहे. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना कर्नल सोफिया कुरेशी यांनी माध्यमांच्या समोर येत भारतीय लष्कराच्या मोहिमेबद्दल माहिती दिली होती.

मंगळवारी महू येथील झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले की, ज्यांनी भारताच्या मुलींना विधवा केले त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच बहि‍णीच्या मदतीने धडा शिकवला. “(उनकी समाज की बहन के जरीये)”. या व्हिडीओमध्ये शाह हे अशाच आशयाचे विधान तीन वेळा उच्चारताना दिसत आहेत.

दरम्यान यामुळे जेव्हा सर्व स्तरांमधून त्यांच्यावर टीका होऊ लागली तेव्हा मात्र शाह यांनी त्यांच्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. “माझ्या वक्तव्य वेगळ्या संदर्भात पाहिले जाऊ नये. मी लोकांना सांगू इच्छितो की माझे भाषण त्या संदर्भात नाही. त्या आपल्या बहि‍णी आहेत आणि त्यांनी सशस्त्र दलांसह मोठ्या ताकदीने बदला घेतला आहे.”

काँग्रेसकडून सडकून टीका

दरम्यान काँग्रेसकडून शाह यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. मध्यप्रदेश काँग्रेसने शाह यांच्या वक्तव्याला लज्जास्पद म्हटले आहे. “भारताची मुलगी, जिच्यावर आपल्या सगळ्यांना अभिमान आहे- हा भ्रमिष्ट आणि अज्ञानी मंत्री तिला दहशतवाद्यांची आणि त्यांच्या समाजाची बहीण म्हणत आहे. मोहन यादव (मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री) यांचे हे मंत्री भारतीय लष्कराचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत असे सुचवण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते अभिनव बरोलिया यांनी दिली आहे.

विशेष बाब म्हणजे, २०१३ मध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर शाह यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता पु्न्हा त्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. शाह हे हरसुद मतदारसंघातून आठ वेळा आमदार राहिले आहेत.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शाह यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शाह यांना पदावरून काढून टाकावे अशी मागणी केली आहे.