भाजपचे आमदार आशिष यांचे टीकास्त्र
बंडखोरीच्या उंबरठय़ावर असलेले भाजपचे काटोल (जि. नागपूर) येथील आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी बुधवारी राजधानीमध्ये येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. विदर्भातील जनतेच्या भरवशावर भाजप सत्तेत आली, पण नेत्यांना वेगळ्या विदर्भाचा विसर पडला असल्याचे ते म्हणाले. केंद्रात व राज्यात बहुमत असताना विदर्भाचे राज् करण्यास मोदींना काय अडचण आहे, असा सवालही त्यांनी केला.
केंद्रात सत्ता मिळाल्यास वेगळा विदर्भ करण्याचे आश्वसन गडकरींनी २०१३मध्ये दिले होते. विधानसभेपूर्वी फडणवीसांनीही तसेच आश्वसन दिले होते. किंबहुना भाजपच्या जाहीरनाम्यात तेच स्पष्टपणे नमूद आहे. मग आश्वसन पूर्ण करण्यात काय अडचण आहे, असा सवाल करून त्यांनी या सर्वांना वैदर्भीय जनतेचा विसर पडल्याचा आरोप केला. आतापर्यंत शिवसेनेच्या विरोधाचे कारण पुढे केले जात होते. आता शिवसेनेने युती तोडलेलीच आहे. मग आतातरी वेगळ्या राज्याचा निर्णय घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. अजूनही विदर्भाला महाराष्ट्र लुटत आहे. विदर्भात नवे उद्योग येत नसल्याने बेरोजगारी वाढत चालल्याचे त्यांनी सांगितले.
वेगळ्या विदर्भाच्या मुद्दय़ावर जनजागृती करण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न धसास लावण्यासाठी डॉ. देशमुख सध्या विदर्भातील ६२ मतदारसंघांमध्ये विदर्भ आत्मबळ यात्रा काढीत आहे. त्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांना देण्यासाठी ते दिल्लीत आले होते; पण रात्री उशिरापर्यंत तरी भेट मिळाली नव्हती. भाजप सोडण्याच्या त्यांच्या हालचालीबद्दल स्पष्ट विचारले असता ते म्हणाले, ‘योग्य वेळी योग्य निर्णय घेईन.’ पक्षाबाबतच्या नाराजीसंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाशी बोललात का, या प्रश्नावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले.