Kangana Ranaut on relief in mandi himachal Pradesh : भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. त्यांनी रविवारी हिमाचल प्रदेशच्या मंडी येथे पूर आल्याने झालेल्या नुकसानची पाहाणी केली. यावेळी खासदार कंगना रनौत यांनी केलेले वक्तव्य सध्या वादात सापडले आहे. पूरामुळे नुकसान झालेल्यांना मदत करण्यासाठी आपल्याकडे कॅबिनेट मंत्रीपद नाही आणि आपत्ती निवारणासाठी निधीही नाही असं त्या म्हणाल्या आहेत. तसेच त्यांनी आपण केंद्राकडून आर्थिक मदत मिळवण्याठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.

“आपत्ती निवारणाचे जे काम आहे, त्यासाठी माझ्याकडे कॅबिनेट तर नाही, मी घटनास्थळी पोहचते पण माझ्या कामाच्या कक्षेत केंद्राकडून निधी घेऊन येणे आहे. माझ्याकडे आपत्ती निवारणासाठी स्वत:चा फंड किंवा कॅबिनेट मंत्रीपद नाही. माझ्याकडे अधिकारीही नाहीत. खासदाराचे एक मर्यादीत काम असते जे संसदेपर्यंतच असते.”

आपण घटनास्थळीवर जात असल्याचे सांगताना कंगना रणौत यांनी हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारवर गंभीर आरोप केले. ज्यांचे नुकासान झाले किंवा जे जखमी झाले आहेत त्यांना सरकारकडून मदत केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “आम्ही आमची सांत्वना घेऊन पोहचतो, पण ज्यांचे हे काम आहे ते तोंड दाखवत नाहीत आणि तोंड लपवून बसलेत, पैसे खाऊन बसलेत. केंद्रातून पैसा आला तर माझ्याकडे तरी असा कोणता निधी नाही, ज्यामधून माझ्याकडे पैसा येईल. आला तरी तो राज्य सरकारकडेच येईल. त्यामुळे निधी द्यायचा त्यांनाच आहे. तरीही आमचं काम आम्ही पूर्ण करू,” असे कंगना रणौत यावेळी म्हणाल्या.

तसेच खासदार कंगना रणौत यांनी केंद्राने हिमाचल प्रदेशात सैन्य पाठवून तात्काळ मदत कार्य सुरू केले. तसेच पाच देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिस्थितीची जाणीव आहे असेही सांगितले. कंगना रनौत या लोकसभा मतदारसंघ मंडी मधून गायब असल्याची टीका काँग्रेसने केली होती, त्यानंतर हा दौरा करण्यात आला.

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी

मंडी जिल्ह्यात ढगफुटी, पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, यामध्ये चौदा जणांचा मृत्यू झाला आहे आणि ३१ जण बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्याचा शोध घेतला जात आह. या आपत्तीत १५० हून अधिक घरे, १०६ गोठे, ३१ वाहने, १४ पूल आणि अनेक रस्त्यांचे नुकसान झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मध्ये एकूण १६४ गुरे मृत्युमुखी पडली आहेत. राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळपर्यंत मंडी जिल्ह्यात सुमारे २०० रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते, तर २३६ ट्रान्सफॉर्मर आणि २७८ पुरवठा योजना विस्कळीत झाल्या आहेत.