टूलकिट प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपामध्ये वाकयुद्ध सुरु आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. या दरम्यान काँग्रेस खासदार आणि आयटी समितीचे सदस्य असलेल्या शशी थरूर यांच्यावर भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. त्यांना आयटी समिती सदस्य पदावरून हटवण्यासह त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निशिकांत दुबे यंनी केली आहे. यासाठी त्यांनी लोकसभा सभापती ओम बिरला यांना पत्र लिहीलं असून संविधानातील दहाव्या अनुसूचीतील नियमांचा संदर्भ दिला आहे.

“शशी थरूर यांच्यामुळे संसद आणि भारताच्या प्रतिमेला तडा गेला आहे. करोना विषाणूच्या व्हेरियंटला भारताचं नाव ते वारंवार देत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं याचं नाव B.1.617 असं दिलं आहे. त्यामुळे त्यांनी वापरलेल्या शब्दामुळे भारताची प्रतिमा डागाळत आहे. भारत सरकारने या शब्दावर आक्षेप घेतला आहे. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्याची मागणी केली आहे. असं असूनही थरून वारंवार या शब्दाचा वापर करताना दिसत आहेत.” असा आरोप भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी पत्रात केला आहे.

“सरकारच्या नव्या नियमांचं पालन करण्यास फेसबुक तयार!; पण…”

शशी थरूर हे देशाऐवजी काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांच्या अजेंड्यावर कराम करत असल्याचा आरोपही निशिकांत दुबे यांनी केला. ‘टूलकिटप्रकरणी आयटी मंत्रालयाकडून ते स्पष्टीकरण मागत आहे. ट्विटर देशाविरोधात कारवाई करत असताना स्पष्टीकरण मागणं चुकीचं आहे. हे प्रकरण तपास यंत्रणांकडे आहे. आयटी समिती सरकारच्या कारवाईत दखल देऊ शकत नाही’, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

गुजरातमधील कोचिंग सेंटरमध्ये धाड टाकली असता समोर आलं धक्कादायक चित्र; पोलीसही संतापले

टूलकिटवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद सुरु आहे. भाजपाने केलेले आरोप काँग्रेसने फेटाळून लावले आहेत. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह पक्षातील अन्य नेत्यांनी भाजपा खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप केला आहे.