भोपाळमधील भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी पहाटेच्या अजानवर आक्षेप नोंदवला आहे. अजानचा लोकांच्या साधना आणि पूजेवर परिणाम होतो. तसेच रुग्ण आणि इतरांना देखील त्रास होतो, असंही त्यांनी म्हटलंय. “पहाटे ४ वाजल्यापासून, मोठ्याने आवाज ऐकू येतात आणि त्यामुळे लोकांची झोप मोडते. साधू-संत ब्रह्म मुहूर्तावर पहाटे ४ वाजल्यापासून त्यांचे ध्यान आणि साधना सुरू करतात, अजानमुळे त्यांना अडथळा येतो, तसेच रुग्णांना त्रास होतो,” असं ठाकूर यांनी एका कार्यक्रमात म्हटलंय.

“बहुधा आमची आरती पहाटे ४ वाजता ब्रह्म मुहूर्तावर सुरू होते, परंतु लोक कोणतीही पर्वा न करता त्यांच्या अजानचा आवाज आमच्याकडे पाठवत राहतात. जेव्हा आमचा समुदाय आमच्या प्रार्थनांसाठी लाऊडस्पीकर लावतो तेव्हा ते आक्षेप घेतात,” असंही साध्वी प्रज्ञा म्हणाल्या.

दरम्यान, भोपाळ मध्यचे आमदार आरिफ मसूद यांनी साध्वी प्रज्ञा यांच्या या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं १३० कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे खासदार म्हणून त्यांनी स्वतःची प्रतिष्ठा लक्षात ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच एका धर्माचा आवाज दुसऱ्या धर्माला कधीच दुखावत नाही, असंही ते म्हणाले.

मसूद पुढे म्हणाले, “ठाकूर स्वत: संत असल्याने त्यांना माहित आहे की लोक त्यांच्या स्वतःच्या श्रद्धा आणि पद्धतीनुसार नामस्मरण करतात. आम्हाला कोणाकडून काहीच समस्या नाही. त्यांना त्यांच्या साधनेदरम्यान छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास कसा होतो. आम्ही अशा गोष्टींना आमच्या मान्यतेत आणि श्रद्धेत कधीही अडथळा आणू देत नाही,” असे आमदार मसूद म्हणाले.