गुरूवारी लोकसभेत केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयक २०१९ वर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान भाजपाचे खासदार गणेश सिंग यांनी अजब दावा केला. “अमेरिकेतील एका शैक्षणिक संस्थेच्या संशोधनानुसार नियमितपणे संस्कृत बोलल्यास मज्जासंस्थेस चालना मिळते. तसंच यामुळे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलही दूर राहतो,” असा दावा सिंग यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर संगणक प्रोग्रामिंग संस्कृतमध्ये केलं गेलं तर ते सध्याच्या प्रणालीपेक्षा अधिक परिणामकारक आणि कार्यक्षम ठरेल, असं अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने केलेल्या कथित संशोधनाचा हवाला देत सिंग यांनी म्हटलं. देशातील ९७ टक्के भाषा या संस्कृतवर आधारित आहेत आणि त्यामध्ये काही इस्लामिक भाषांचाही समावेश होतो. या भाषांचं मूळ हे संस्कृतमध्येच आहे, असंही ते यावेळी म्हणाले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रताप चंद्र सारंगी यांनीदेखील संस्कृत भाषेविषयी आपलं मत व्यक्त केलं. संस्कृत या भाषेत एक वाक्य विविध प्रकारांनी बोलता येऊ शकतं इतकी ती भाषा लवचिक असल्याचं त्यांनी म्हटलं.

इंग्रजीमधील अनेक शब्द संस्कृतमधूनच आले आहेत. यामध्ये ब्रदर, काऊ असे काही शब्द संस्कृतमधूनच घेण्यात आले आहेत. संस्कृत सारख्या प्राचिन भाषेचा प्रचार केल्यास त्याचा इतर भाषांवर कोणताही परिणाम होणार नाही, असं सारंगी यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, गुरूवारी केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयक २०१९ ला लोकसभेत मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत नवी दिल्लीतील राष्ट्रीय संस्कृत संस्थान, श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ आणि तिरुपतीमधील राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp says speak sanskrit and keep diabetes cholesterol away in lok sabha during discussion jud
First published on: 13-12-2019 at 08:51 IST