गेल्या काही दिवसांपासून भाजपा खासदार वरुण गांधी यांनी सातत्याने आपल्या पक्षाच्या केंद्र सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी जवळपास वर्षभरापासून सुरू केलेल्या आंदोलनाला वरुण गांधींनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका देखील केली आहे. त्यामुळे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची नाराजी देखील त्यांनी वारंवार ओढवून घेतली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्राकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेवर वरुण गांधी यांनी निशाणा साधला असून यासाठी त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा एक जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे या व्हिडीओमध्ये?

वरुण गांधी यांनी हा व्हिडीओ शेअर करताना “एका विशाल ह्रदयाच्या माणसाचे शहाणपणाचे शब्द”, असा मेसेज लिहिला आहे. या व्हिडीओमध्ये अटल बिहारी वाजपेयींनी तत्कालीन इंदिरा गांधी सरकारवर टीका करताना शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा मानस स्पष्ट केला आहे. “मी सरकारला इशार देतो की तुम्ही या दबाव टाकण्याच्या पद्धती सोडून द्या. घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. शेतकरी घाबरणार नाहीत”, असं अटल बिहारी वाजपेयी या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत.

“जर सरकार दबावतंत्र वापरणार असेल…”

या व्हिडीओमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी सरकारला इशारा देखील दिला आहे. “आम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा राजकारणासाठी वापर करू इच्छित नाही. पण आम्ही शेतकऱ्यांच्या योग्य मागणीला समर्थन देतो. जर सरकार दबावतंत्र वापरणार असेल, कायद्याचा दुरुपयोग करणार असेल आणि शांततापूर्ण आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न करेल, तर शेतकऱ्यांच्या संघर्षात उडी घेण्यात आम्ही अजिबात मागे हटणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू”, असं वाजपेयींनी म्हटलं आहे.

वरुण गांधी यांना शेतकरी आंदोलनाविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे सातत्याने पक्षश्रेष्ठींच्या नाराजीचा सामना करावा लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकत्याच जाहीर झालेल्या भाजपाच्या केंद्रीय पक्ष कार्यकारिणीमधून त्यांना आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांना डच्चू देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp varun gandhi shares atal bihari vajpeyee old video targeting indira gandhi on farmers issue pmw
First published on: 14-10-2021 at 14:30 IST