लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक आणखी लांबणीवर पडली आहे. मात्र, पाकिस्तानविरोधातील लष्करी कारवाई हे त्यामागील एकमेव कारण नसल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अपेक्षांची पूर्तता करू शकणाऱ्या नेत्याचा शोध अजून संपलेला नसल्यानेच निवड केली नसल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी २०२३मध्ये संपला. त्यांना जून २०२४पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत संपूनही जवळजवळ एक वर्ष उलटले असताना भाजपला अद्याप नवा चेहरा मिळालेला नाही. अध्यक्षपदाची निवड इतकी कधीच लांबली नव्हती. पण, या वेळी संघ व भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा भाजपमध्ये रंगली आहे. भाजपच्या यशात संघाचे योगदान उघडपणे मान्य करणारा, संघटना स्वतंत्रपणे चालवण्याचा वकूब असणारा, देशभर भ्रमण करू शकेल असा तुलनेत तरुण, वैचारिक स्पष्टता आणि भाषिक कौशल्ये असणारा तसेच, आगामी राजकीय दिशा लक्षात घेऊन पक्षाला पुढे नेणारा नेता संघाला अपेक्षित आहे. या अटी-शर्तीनुसार अध्यक्ष नियुक्त करायचा की, मोदी-शहांच्या विश्वासातील नेत्याची निवड करायची यावरून संघ व भाजपमध्ये समन्वय साधला जात असल्याचे एका राष्ट्रीय पदाधिकाऱ्याने सांगितले.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर शहा राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांच्यानंतर नड्डा यांना अध्यक्ष केले गेले असले तरी सर्व निर्णय प्रामुख्याने शहांच्या परवानगीने घेतले गेले. मात्र पक्षाची सूत्रे भाजपला नव्या युगात घेऊन जाणाऱ्या तडफदार नेत्याकडे देण्याचा विचार संघामध्ये केला जात असल्याचे घडामोडींशी जवळून संबंध असलेल्या नेत्याचे म्हणणे आहे. ‘भाजपला संघाची गरज नाही’, असे विधान नड्डांनी केल्यामुळे संघ नाराज होता. भाजपच्या नव्या अध्यक्षाकडून संघाबद्दल वादग्रस्त भूमिका घेणे अपेक्षित नाही.

भाजपच्या निर्णय प्रक्रियेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वर्चस्व असले तरी, त्यांच्याकडे केंद्र सरकारच्या कामांचीही जबाबदारी आहे. त्यांच्या सरकारमधील कामांचे स्वरूपही व्यापक होत असल्यामुळे त्यांना एकहाती पक्षाची सूत्रे सांभाळणे सोपे नसेल. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चा होत असलेल्या संभाव्य नेत्यांची शहांशी अधिक जवळीक आहे. शिवाय, चर्चेतील नावांचा भाजपमध्ये गांभीर्याने विचार केला जात नाही. त्यामुळे मोदी-शहांनी सुचवलेल्या नावांवर शिक्कामोर्तब होणार की, संघाकडून दिलेल्या सल्ल्याला प्राधान्य दिले जाणार यावर नवा राष्ट्रीय अध्यक्ष ठरेल, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर संभाव्य नावांबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात लक्ष घालण्याची सूचना संघाने केली असल्याचे बोलले जात होते. मात्र, विधानसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे संभाव्य नावांमधून फडणवीस वगळले गेले. त्यानंतर अद्याप संघाची अपेक्षापूर्ती करू शकेल असा उमेदवार सापडलेला नाही. पहलगाममधील हल्ला व ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भाजपने निवडप्रक्रिया किमान दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. याखेरीज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली या महत्त्वाच्या राज्यांचे प्रदेशाध्यक्षही निवडणे बाकी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदीभागवत चर्चेनंतर निर्णय?

पंतप्रधान मोदी यांनी मध्यंतरी नागपूरला संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाच्या वरिष्ठ नेत्यांशी समन्वय साधला. त्याचा अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये कितपत लाभ होईल, यादृष्टीने विचार केला जात असल्याचे भाजप पदाधिकाऱ्याचे म्हणणे आहे. या भेटीनंतरच केंद्राने जातनिहाय जनगणनेची घोषणा केली होती. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे दिल्ली दौऱ्यात मोदींशी चर्चा करणार होते. मात्र पहलगाममधील हल्ल्यामुळे चर्चा बारगळल्याचे सांगितले जात आहे. आता नवा पक्षाध्यक्ष निवडीसाठी संघ व भाजप नेत्यांच्या संभाव्य चर्चेकडेच इच्छुकांचे लक्ष आहे.