भाजपच्या वरिष्ठ मंत्र्याची टिप्पणी; शिवसेनेने दगाफटका केल्यास राष्ट्रवादीचा पर्याय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची युती का शक्य नाही? बिलकूल शक्य आहे. अस्वस्थ शिवसेनेने ऐन वेळेला दगाफटका केल्यास आमच्या हाती पर्याय असलाच पाहिजे,’’ अशी टिप्पणी वरिष्ठ केंद्रीय मंत्र्याने केली. राष्ट्रवादीबरोबरील हातमिळवणी भाजपच्या मतपेढीच्या पचनी पडण्याची खात्रीही त्याने वर्तविली.

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या नियमित संपर्कात असतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही पवारांचा उत्तम संपर्क आहे. मग भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येण्यात काय अडचण आहे?’’ असा उलट प्रश्न विचारून मंत्री म्हणाले, ‘‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात भाजपबद्दल असलेला कडवटपणा लक्षात घेतला तर भाजप-शिवसेना युतीला फार भवितव्य असल्याचे वाटत नाही. अपरिहार्य परिस्थितीने शिवसेनेचे हात बांधलेत; पण ते केव्हाही पाठिंबा काढून घेण्याची खेळी करू शकतात. म्हणून आम्हाला राष्ट्रवादीचा पर्याय खुला ठेवणे भाग आहे.’’

भाजपशी हातमिळविणीच्या नुसत्या अफवा असल्याचा दावा पवारांनी आपल्याशी बोलताना केल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच दिली. त्याच वेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना मंत्री करण्याचा प्रस्ताव मोदींनी दिला होता; पण स्वत: सुळेंनी नकार दिल्याचेही पवारांनी सांगितल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. या पाश्र्वभूमीवर या वरिष्ठ मंत्र्याने राष्ट्रवादीबरोबरील युतीची शक्यता अजिबात नाकारली नाही.

भाजप-शिवसेना युती विचारधारेवर आधारलेली नैसर्गिक होती; पण भाजप व राष्ट्रवादीची युती तुम्हा दोन्ही पक्षांच्या मतदारांना कितपत रुचेल? या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘भाजपच्या मतदारांचा प्रश्नच नाही. भाजप आता बदललाय. पक्षाचा सामाजिक पाया विस्तारला आहे. दलित आमच्याकडे मोठय़ा प्रमाणात येत आहेत. अशा स्थितीत आम्हाला काही अडचण येणार नाही. दुसरीकडे, राष्ट्रवादीला ना विचारधारा, ना स्वत:ची मतपेढी. तो पक्ष सगळा ठरावीक शिलेदारांच्या भरवशावर आहे. त्यातले निम्म्याहून अधिक शिलेदार तर आमच्या दरवाजावर उभे आहेत. कुणाला घ्यायचे, एवढाच प्रश्न आहे.’’

गुजरात राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांनी भाजपला मतदान केल्यापासून दोन्ही पक्ष जवळ येत असल्याच्या चर्चेने जोर धरला होता.

सुळे व प्रफुल्ल पटेल मंत्री होणार असल्याचीही कंडी राजधानीत पिकली होती. मंत्रिपदाच्या प्रस्तावाच्या चर्चेला पवारांनी दुजोरा दिला असला तरी हातमिळविणीचा मात्र ठाम इन्कार केल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.

राणेंबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती असल्याची माहिती या वरिष्ठ मंत्र्याने दिली. ‘‘फडणवीसांच्या मनात अजूनही चलबिचल आहे; पण त्यांच्या भूमिकेवरच राणेंचा प्रवेश अवलंबून असेल. कारण फडणवीसांच्या शिफारशीनुसारच मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा निर्णय घेतील,’’ असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ncp alliance possible maharashtra government shiv sena bjp shiv sena alliance
First published on: 12-09-2017 at 03:59 IST