देशाचे ऐक्य आणि धर्मनिरपेक्ष तत्त्व यांच्या रक्षणासाठी लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विजय मिळणे महत्त्वाचे आहे, असे मत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येथे व्यक्त केले. भाजपची खोटी आश्वासने आणि अपप्रचार यांना बळी पडू नका, असा इशाराही सोनिया गांधी यांनी दिला.
माकपची विचारसरणी कालबाह्य़ झाली असून ते आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हिंसक मार्गाचा अवलंब करीत आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत मतभेद दूर ठेवून निवडणुकीची तयारी करा, असे आवाहनही त्यांनी यूडीएफच्या प्रचाराची सुरुवात करताना केले. देशाच्या धर्मनिरपेक्ष आणि ऐक्याच्या तत्त्वाला धोका निर्माण झाल्याचेही त्या म्हणाल्या.
काही शक्तींना केवळ राज्यकारभार करावयाचा नाही तर देशाचा आत्माच बदलण्याची त्यांची मनीषा आहे. त्यामुळे भारताच्या संकल्पनेलाच धोका निर्माण झाला आहे. काँग्रेसला देशात ऐक्य हवे असताना प्रमुख विरोधी पक्ष फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. त्यामुळे शांततेला मतदान करावयाचे की भीती निर्माण करणाऱ्या घटकांना साथ द्यावयाची यामधून एकाची निवड करावी लागेल, असेही त्या म्हणाल्या.
देशाचे ऐक्य आणि धर्मनिरपेक्षतेला सध्या धोका असल्याने या तत्त्वाच्या रक्षणासाठी लोकसभेच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. आपल्याला कोणत्या प्रकारचा भारत निर्माण करावयाचा आहे, याचा निर्णय होणार असल्याने २०१४च्या निवडणुका सर्वात महत्त्वाच्या आहेत, असे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
सर्वाचा भारत की स्वहित जपण्यासाठी मूठभर लोकांच्या हातातील भारत यामधून आपल्याला निवड करावयाची आहे. आम्हाला ऐक्य हवे आहे तर त्यांना फूट हवी आहे. आमच्या संकल्पनेमुळे भारत अखंड राहणार आहे तर त्यांच्या संकल्पनेमुळे विभाजन होणार आहे, असा हल्लाही सोनिया गांधी यांनी भाजपवर चढविला. यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या राजवटीनंतर जनतेला बदल हवा असल्याचे प्रमुख विरोधक सांगतात, मात्र त्यांना कशात बदल हवा आहे, खोटय़ानाटय़ा आश्वासनांसाठी भारतातील जनतेला आपल्या पारंपरिक मूल्यांना तिलांजली द्यावयाची आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मतैक्याच्या अभावामुळे लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ न शकल्याबद्दल सोनिया गांधी यांनी खंत व्यक्त केली.