पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी गोंदियात सभा झाली. मेरठ आणि वर्धा येथील सभेत गर्दी न झाल्याने भाजपाची नाचक्की झाली असतानाच गोंदियात मात्र भाजपाने बऱ्यापैकी गर्दी जमवण्यात यश मिळवले. मात्र, ही गर्दी पैसे देऊन जमा करण्यात आल्याचे ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या पाहणीतून समोर आले. १०० रुपयांपासून ते प्रति गाडी ५०० रुपयांपर्यंत हे पैसे देण्यात आल्याचे सभेसाठी आलेल्या लोकांनी मान्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदियात बुधवारी सभा घेतली. मेरठ आणि वर्धा येथील मोदींच्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवल्यानंतर गोंदियातील सभेत भाजपाने गर्दी जमवण्याकडे विशेष लक्ष दिले होते. गोंदियात भाजपातर्फे अनेकांना व्हीआयपी पास वाटण्यात आले होते. व्हीआयपी पास मिळाल्याने अनेक जण सभास्थळी मोदींना पाहण्यासाठी आले होते. वर्धा येथील सभेतही व्हीआयपी पास छापण्यात आले होते. मात्र, तो आकडा १५० ते २०० इतका होता, असे समजते. पण गोंदियात मात्र हजारो व्हीआयपी पास छापण्यात आल्याचे समजते. याबाबत भाजपाच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी नेमका आकडा उपलब्ध नसल्याचे ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला सांगितले. गर्दी जमवण्यासाठी भाजपाने ही नवी शक्कल लढवल्याचे सांगितले जाते.

व्हीआयपी पाससोबतच पैसे देऊनही गर्दी जमवण्यात आली होती. सिग्नल टोळी या गावातील काही महिलांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया दिली आहे. १५० रुपये मिळाल्याचे या महिलांनी मान्य केले.

अनेकांनी खासगीत बोलताना पैसे मिळाल्याचे मान्य केले. काहींनी ‘आता एका गाडीमागे ५०० रुपये मिळाले. हे पैसे नाश्ता आणि पाण्यासाठी देण्यात आले. उर्वरित पैसे नंतर मिळतील”, असे सांगितले. पण कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

असे हजारो व्हीआयपी पास छापण्यात आले

मोदींचे भाषण सुरु असताना लोक बाहेर

सभेला गर्दी जमवण्यात भाजपाला काही अंशी यश आले. पण मोदींचे भाषण सुरु असतानाच बरेच जण मैदानातून बाहेर पडली. या मंडळींना विचारणा केली असता घरी जाण्यास उशीर होतोय, असे सांगण्यात आले.