अभिनेत्री कंगना रणौतनं राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातून भाजपाच्या तिकिटावर लढण्याची इच्छा कंगनानं ‘पंचायत आज तक’ या कार्यक्रमात व्यक्त केली आहे. कंगनाच्या या विधानावर भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याच कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपात कंगनाचं स्वागत आहे, पण निवडणूक लढण्याबाबतचा निर्णय सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाईल”, असे नड्डा यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हिमाचलची जनता आणि पक्षाची इच्छा…” आगामी निवडणुक लढवण्यासंदर्भात कंगना रणौतने दिला इशारा

जनतेला हवं असल्यास आणि भाजपानं तिकीट दिल्यास हिमाचल प्रदेशातील मंडीमधून निवडणूक लढण्यास तयार असल्याचं कंगनानं शनिवारी म्हटलं होतं. “पक्षासाठी काम करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी पक्षात खूप जागा आहे. कंगना यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवावी की नाही, हा माझ्या एकट्याचा निर्णय असू शकत नाही. त्यासाठी पक्षाच्या तळागाळातील स्तरापासून संसदीय समिती, निवडणूक आयोगाची प्रक्रिया आहे”, असे नड्डा म्हणाले आहेत.

“मला माझे ट्विटर अकाऊंट परत मिळाले तर…” कंगना रणौतचे स्पष्ट वक्तव्य

“आम्ही अटींच्या आधारावर कोणालाही पक्षात स्थान देत नाही. आम्ही सर्वांना सांगतो, तुम्हाला बिनशर्त यावे लागेल आणि मगच पक्ष त्याबाबत निर्णय घेणार”, अशी पक्षाची भूमिका नड्डा यांनी स्पष्ट केली आहे. ‘पंचायत आज तक’ या कार्यक्रमात बोलताना भाजपा अध्यक्षांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. “हिमाचल प्रदेशातील नागरिक भाजपाला पुन्हा मतदान करतील. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विजयाचा ट्रेंड प्रस्थापित करत आहोत”, असे नड्डा यांनी म्हटले आहे.

गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी; लिंग गुणोत्तर, साक्षरतेची काय स्थिती?

हिमाचल प्रदेशात १२ नोव्हेंबरला एका टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी ८ डिसेंबरला पार पडणार आहे. या राज्यात सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट सामना होत आहे. २०१७ मध्ये गमावलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp president jp nadda commented on kangana ranaut hint to join politics and contest himachal pradesh loksabha election rvs
First published on: 30-10-2022 at 10:14 IST