भाजपा राज्यसभा खासदार रामचंद्र जांगडा यांना आज(शुक्रवार) आंदोलक शेतकऱ्यांचा रोषाला सामोरं जावं लागलं. शेतकऱ्यांच्या एक गटाने हरियाणामधील हिस्सार जिल्ह्यात खासदार जांगडा हे एका धर्मशाळेच्या उद्घाटनासाठी आले असात त्यांना काळे झेंडे दाखवले गेले आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी, पोलीस व आंदोलकांधमध्ये झडप झाली, शिवाय खासदार जांगडा यांच्या कारची काचही देखील फोडली.

घटनास्थळी मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी चारी बाजुंनी बॅरीकेड्स लावले होते. मात्र आंदोलक शेतकरी मोठ्या संख्येत असल्याने पोलिसांना त्यांना नियंत्रणात ठेवणे शक्य झाले नाही. मोठ्या प्रयत्नानंतर शेतकरी कार्यक्रमस्थळी पोहचले व सरकार आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर, दुसरीकडे खासदाराचे समर्थक त्यांचा जय जयकार देखील करत होते.

या अगोदर भाजपा खासदारास रोहतक येथे गुरूवारी देखील एका कार्यक्रमात विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. त्यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालेला आहे. त्यांनी आंदोलकांना उद्देशून बेरोजगार मद्यपी असं म्हणत, विरोध करणाऱ्यांमध्ये कुणीच शेतकरी नव्हतं असं देखील सांगितलेलं आहे.

पंतप्राधानांच्या कार्यक्रमाच्या लाईव्ह प्रेक्षपणादरम्यान देखील गोंधळ –

रोहतकमधील किलोई गावाताली प्राचीन शिव मंदिराजवळ भाजपा नेते आणि शेतकरी समोरा-समोर आले होते, हे पाहून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. उत्तराखंडमध्ये केदारनाथ येथे पंतप्रधान मोदी पोहचल्यानंतर, त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते झालेली पूजा, भूमिपूजन व उद् घाटन कार्यक्रमाचे लाईव्ह प्रेक्षेपण दाखवले जात होते.