माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेवरुन केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर भाजपाने त्यांना उत्तर दिलं आहे. मनमोहन सिंग यांच्या नेृत्त्वात भारताने प्रगती केली नसती कारण काही जणांनी भ्रष्टाचार, कुटुंबवादासाठी त्यांचा फक्त बाहुला म्हणून वापर केला असा टोला भाजपाकडून लगावण्यात आला आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणाने भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत बळकटी दिली असून आघाडीच्या देशांत स्थान दिलं असल्याचंही भाजपाने म्हटलं आहे.
भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत भारतीय अव्यवस्था सुस्थितीत असल्याचा दावा केला. “जीएसटी आणि करप्रणालीत बदल करत मोदी सरकारने गेल्या सहा वर्षात अर्थव्यवस्थेत बदल केल्यानेच हे शक्य झालं”, असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
“मनमोहन सिंग हे अर्थतज्ञ होते पण पडद्यामागील काहीजणांनी त्यांचा फक्त बाहुला म्हणून वापर केला. आपले कायदे अंमलात आणण्यासाठी तसंच भ्रष्टाचार, कुटुंबादाला प्रोत्साहन देण्याचा त्यांचा वापर करण्यात आला”, असं संबित पात्रा यांनी म्हटलं. सध्या “मोदी है तो मुमकीन है” याचाच नारा दिला जात असून पंतप्रधानांनी गेल्या सहा वर्षात योग्य निर्णय घेत मजबूत अर्थव्यवस्था निर्माण केली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये भारतालाही स्थान मिळालं असल्याचं यावेळी संबित पात्रा यांनी सांगितलं.
सुडाचे राजकारण सोडून अर्थव्यवस्था सुधारावी!
देशाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे सरकारने राजकीय सूडभावना बाजूला ठेवून विवेकी-विचारी लोकांशी चर्चा करावी आणि या मानवनिर्मित संकटातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढावे, असे आवाहन माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी रविवारी केले.
मोदी सरकारच्या सर्व क्षेत्रातील गैरव्यवस्थापनामुळे मंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थव्यवस्था चिंताजनक आहे. गेल्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनवाढीचा (जीडीपी) दर ५ टक्क्य़ांपर्यंत घसरला. याचा अर्थ आपण प्रदीर्घ मंदीच्या कचाटय़ात सापडलो आहोत. वेगाने आर्थिक विकास करण्याची भारताची क्षमता आहे, पण मोदी सरकारच्या सर्व क्षेत्रांतील गैरव्यवस्थापनामुळे ही वेळ ओढवली आहे, अशी टिप्पणी मनमोहनसिंग यांनी केली.
सरकारवर टीका करताना माजी पंतप्रधान म्हणाले, ‘‘देशातील युवक, शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, वंचित घटक यांना चांगल्या आर्थिक स्थितीची अपेक्षा आहे. परंतु देशाला सध्याच्या मार्गाने जाऊन चालणार नाही. सरकारने सूडाचे राजकारण सोडून सर्व विचारी माणसांशी सल्लामसत करून या मानवनिर्मित अर्थपेचातून देशाला बाहेर काढावे.’’