दिवंगत नेते, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गेल्या काही काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भूमिका मांडली होती. त्यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. तर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना पद सोडण्यास भाग पाडले गेले, असा आरोप करण्यात येत आहे. या दोन जाट नेत्यांवर भाजपाने अन्याय केला, असा आरोप मध्य प्रदेशमधील भाजपाच्या एका प्रवक्त्याने केला होता. आता पक्षाने या प्रवक्त्याची हकालपट्टी केली आहे.

शुक्रवारी भाजपाचे प्रवक्ते कृष्ण कुमार जानू यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. मात्र यासाठी कारण वेगळेच दिले गेले. जूनमध्ये झुंझुनू जिल्याच्या अध्यक्षपदी हर्षिनी कुल्हारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीला आक्षेप घेत केलेल्या टिप्पणीमुळे जानू यांना पक्षातून काढल्याचे सांगितले जात आहे.

मध्य प्रदेश भाजपाच्या राज्य शिस्तपालन समितीचे अध्यक्ष ओकांर सिंह लखावत यांनी म्हटले की, २० जून रोजी जानू यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. याला नोटिशीला समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे त्यांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली.

जानू यांचा एक व्हिडीओ काही दिवासंपूर्वी व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांनी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना कथित अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल आणि जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदावरून तडकाफडकी बाजूला केल्याबद्दल संताप व्यक्त केला होता. दोघेही जाट नेते असल्यामुळेच त्यांच्यावर अन्याय झाला असे जानू या व्हिडीओत बोलत होते.

या व्हिडीओमध्ये जानू म्हणतात, ठमाजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना पक्षाने अपमानास्पद वागणूक दिली. मलिक पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षही होते. त्यांचे अंत्यसंस्कार पाहता सरकारने त्यांच्याबरोबर योग्य केले नाही. त्यामुळे तीव्र दुःख झाले. त्यामुळे पक्षात काम करणाऱ्या जाट नेत्यांना, जाट आमदार आणि खासदारांना मी प्रश्न विचारतो की हे बरोबर आहे का?”

लोकनेत्यांना भाजपाकडून वाईट वागणूक

सत्यपाल मलिक यांच्याबरोबर जे घडले ते इतरांबरोबर घडणार नाही, असे ठामपणे कुणी सांगू शकते का? असाही प्रश्न जानू यांनी उपस्थित केला. तसेच जानू पुढे म्हणाले की, पक्षाच्या विद्यमान श्रेष्ठींनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, प्रवीण तोगडीया, संजय जोशी आणि वसुंधरा राजे यांना बाजूला केले. आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याबरोबरही तेच केले जात आहे.

जानू पुढे म्हणाले, “लोकांशी जोडले गेलेल्या नेत्यांना भाजपा अतिसय वाईट वागणूक देते, हे दुःखद आहे. पक्ष चुकीच्या दिशेने जात आहे. तरीही लोक का शांत आहेत, हे कळायला मार्ग नाही.”