नरेंद्र मोदींचा मुद्दा पुढे करीत भाजपशी घरोबा संपवणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पुरते अडचणीत आणण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.
भाजप नितीशकुमारांचा दांभिकपणा त्यांच्याच भाषणांच्या सीडी बिहारच्या जनतेसमोर वाजवून उघड करणार आहे. या भाषणांमध्ये नितीशकुमार गुजरातमध्ये झालेल्या २००२ च्या दंगलींपासून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे गोडवे गात आसल्याचे जनतेला ऐकायला मिळणार असल्याचा दावा भाजपने केला आहे.
“आमच्याकडे बऱयाच सीडी आहेत, ज्यामध्ये नितीशकुमार अतिशय मोकळेपणाने आणि जाहीरपणे नरेंद्र मोदींचे कौतुक करीत आहेत. नरेंद्र मोदींचे नेतृ्त्त्व व त्यांच्या कामाची पद्धत देशासाठी निश्चित फायद्याची आहे, असा उल्लेख त्यांच्या जाहीर भाषणांमध्ये कितीतरी वेळा आलेला आहे. आम्ही सर्व सीडी गोळा केल्या आहेत. लवकरच बिहारच्या जनतेसमोर सीडी प्रसिद्ध करून नितीशकुमार यांचा दांभिकपणा बाहेर काढू,” असे भाजपचे राज्यातील नेते सुशीलकुमार मोदी यांनी सांगितले.
भाजपचे नेते राज्याचा कानाकोपरा पिंजून काढून, प्रत्येक गावाच्या चौकांमध्ये, नाक्यांवर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने या सीडी वाजवणार आहेत. या सीडीमध्ये नितीशकुमार २००२ च्या गुजरात दंगलीपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये नरेंद्र मोदींचे गोडवे गात असलेली भाषणे असल्याचे सुशीलकुमार म्हणाले.
गुजरात, कच्छ येथील एका कार्यक्रमामध्ये १३ डिसेंबर २००३ रोजी, नरेंद्र मोदींनी गुजरातचा विकास केला आहे. या पाठीमागे काय घडले ते कायमचे विसरून जा व मोदींच्या विकासाच्या कार्यक्रमाचे कौतुक करा, असा उल्लेख नितीशकुमार यांच्या भाषणामध्ये असल्याचे सुशीलकुमार म्हणाले.
“भाजपने मोदींना २०१३ मध्ये राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नितीशकुमारा यांनी दशका पूर्वीच मोदींच्या राष्ट्रीय राजकारणातील आगमना विषयी भाकीत केले होते,” असा टोला सुशिलकुमार यांनी लगावला.