भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पक्षावर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले असून ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभेची निवडणूक लढवू नये, असा फतवावजा प्रस्ताव मांडला आहे. या न्यायाने भाजपचे वयोवृद्ध नेते लालकृष्ण अडवाणी व मुरलीमनोहर जोशी यांना राज्यसभा सदस्यत्व देवून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना लोकसभा निवडणुकीत संधी देण्यावर भाजपमध्ये चर्चा आहे. अडवाणी यांना गुजरात तर जोशी यांना छत्तीसगढमधून राज्यसभेवर पाठविण्यात येईल. मोदींकडून गांधीनगर, वाराणसी लोकसभा मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे.
भाजप लढवित असलेल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची माहिती मोदींकडे आहे. भविष्यात भाजप काँग्रेसच्या तुलनेत युवा नेत्यांचा पक्ष, अशी प्रमिता निर्माण करण्यासाठी मोदींची धडपड आहे. पक्षाच्या शुक्रवारी झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. अडवाणी व जोशी यांच्यासारख्या वयोवृद्ध नेत्यांना आता राज्यसभेत धाडले पाहिजे, या मोदींच्या प्रस्तावावरदेखील बैठकीत चर्चा झाली. जोशींना पर्याय मान्य असला तरी अडवाणी मात्र नाराज झाले आहे. छत्तीसगढमधील एका तर गुजरातमधून चार राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. आवश्यकता वाटल्यास अडवाणी व जोशींना गुजरातमधूनच राज्यसभेवर पाठवावे, यावर पक्षात खल सुरू आहे. केंद्रीय निवडणूक समिती कोणत्याही निर्णयाप्रत न आल्याने पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांना सर्वाधिकार सोपविण्यात आले आहेत.