कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील रामेश्वर कॅफेमध्ये १ मार्च रोजी बॉम्बस्फोट झाला होता. आरोपीने कॅफेमध्ये स्फोटकांनी भरलेली बॅग ठेवली आणि त्यानंतर आरोपी तिथून निघून गेला होता. या स्फोटामध्ये १० लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. या स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू होता. सुरुवातीला या प्रकरणात ‘पॅाप्युलर फ्रंट ॲाफ इंडिया’शी (पीएफआय) संबंधित एकाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एनआयएने साई प्रसाद नावाच्या भाजपा कार्यकर्त्याला अटक केली आहे, अशी बातमी इंडिया टुडे या संकेतस्थळाने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
रवा इडली खाल्ली आणि आरोपी स्फोटकांची बॅग कॅफेत ठेवून गेला
साई प्रसादला आता चौकशीसाठी एनआयएने ताब्यात घेतले आहे. या स्फोटाशी संबंधित दोन संशयितांचा आणि त्याचा काही संबंध आहे का? याबद्दल चौकशी केली जात आहे. मागच्या आठवड्यात एनआयएने शिवमोग्गा जिल्ह्यात काही ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यामध्ये आरोपीचे मोबाइल दुकान आणि इतर दोन संशयितांच्या घरावर धाड टाकली होती.
रामेश्वर कॅफेमध्ये काय घडले होते?
बंगळुरुच्या व्हाइटफिल्ड परिसरात स्थित असलेला रामेश्वर कॅफे शहरात लोकप्रिय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने कॅफेमध्ये बॅग सोडली. नाश्ता केल्यानंतर तो बॅग तिथेच सोडून निघून गेला. त्यानंतर बॉम्बस्फोट झाला.
सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये काय दिसले?
संशयित आरोपीने मास्कने आपला चेहरा झाकलेला असल्याचे सीसीटीव्ही चित्रणात दिसत होते. तसेच त्याने चष्मा घातलेला असून डोक्यावर टोपी होती. कॅफेत आल्यानंतर त्याने रवा इडलीची ऑर्डर दिली, आपली ऑर्डर घेऊन जातानाही तो सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. शुक्रवारी (दि. १ मार्च) दुपारी १२.५० ते १ वाजण्याच्या सुमारास हा बॉम्बस्फोट घडला. या दुर्घटनेत १० लोक जखमी झाले.
या स्फोटानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. चेहरा ओळख प्रणालीद्वारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार आरोपीचे वय २५-३० असल्याचे सांगितले जाते. वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी एका बसमधून कॅफेजवळ उतरल्याचे दिसत आहे. कॅफेमध्ये इडली विकत घेण्यासाठी त्याने रोकड दिली होती. इडली खाल्ल्यानंतर तिथेच आपली बॅग सोडून जाताना तो दिसत आहे. कॅफेमध्ये त्याने सात मिनिटं घालवली.