Bihar Crime : बिहारमधील नवादा जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. काळी जादू केल्याच्या संशयावरून काही गावकऱ्यांनी पतीसह पत्नीला गंभीर मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीत ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर त्या व्यक्तीची पत्नी देखील गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर नवादा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, “आम्हाला माहिती मिळाली की काही गावकऱ्यांनी एका जोडप्यावर हल्ला केला आहे. यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला आणि पत्नीलाही जिवंत जाळण्यासाठी घेऊन जात होते. मात्र, घटनास्थळी आम्ही पोहोचलो. या मारहाणीच्या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. तसेच तिचा पती आम्हाला मृत अवस्थेत आढळून आला आहे, असं पोलिसाांनी सांगितलं. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
पोलिसांनी मृत पुरूषाची ओळख पटवली असून गया मांझी असं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, नवादा पोलीस अधीक्षकांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की या प्रकरणात आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले की, “स्थानिक रहिवासी मोहन नामक व्यक्तीच्या घरी आयोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमात पीडितांनी काळी जादू केल्याची अफवा पसरली. तसेच मोहनच्या कुटुंबाने भाड्याने घेतलेली म्युझिक सिस्टीम वारंवार बंद पडत असल्याने त्यांनी पीडितांवर काळी जादू केल्याचा आरोप केला आणि त्यांच्यावर जोरदार हल्ला केला.”
पोलिसांनी म्हटलं की, “या घटनेत सहभागी असल्याच्या आरोपाखाली आम्ही मोहन आणि नऊ महिलांसह एकूण १७ जणांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. गावकऱ्यांच्या एका गटाने जोडप्याला मारहाण केली आणि त्यांचा अपमान केला. त्यांना रस्त्यावर फिरवलं, त्यांचं डोके अर्धवट मुंडन केलं. त्यांना बूट आणि चप्पलांचे हार घातले. या संपूर्ण घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत कारवाई केली आहे.”