कोटय़वधी डॉलर्सचे काळे धन ‘कायदेशीर’ करून घेण्यासाठी हिरा व्यावसायिकांची व्यापारी खाती वापरण्याचे प्रमाण वाढत आहे आणि या प्रकरणांमध्ये जगभरात आघाडीवर असलेल्या पहिल्या पाच देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. ‘फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स’ या पॅरिस येथील संस्थेने सादर केलेल्या ‘जागतिक अर्थ गुन्ह्य़ां’वरील अहवालात ही बाब पुढे आली आहे.
भारतात हिऱ्यांच्या किमती ठरविण्यासाठी कोणतीही प्रमाणित यंत्रणा सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे या व्यवहारांमधील दलाल मौल्यवान खडय़ांच्या अवाजवी किमती सांगतात आणि खरेदी करणारेही आपल्याकडील ‘काळा पैसा’ ‘प्रवाहात’ आणण्याच्या उद्देशाने त्या रक्कमेचा भरणा करून हिरे विकत घेतात, असे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.
अन्य देशांतही असे गैरप्रकार
अन्य वस्तूंच्या खरेदी-विक्रीत असे गैरव्यवहार करणे सहजशक्य नाही, कारण त्यांच्या किमती किंवा निदान त्यांच्या सापेक्ष किमती निश्चित असतात. पण भारताव्यतिरिक्त हाँगकाँग, चीन, इस्राइल, बेल्जियम, कॅनडा, स्वित्र्झलड, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिकेतही असे आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचे या अहवालात म्हटले आहे. सुरत आणि मुंबईतील काही हिरे व्यापाऱ्यांनी हाँगकाँग आणि चीनमधून ५४४.८७ डॉलर प्रति कॅरेट या भावाने हिरेखरेदी केल्याचे आर्थिक अंमलबजावणी संचालनालयाच्या निदर्शनास आले असून याची चौकशी सुरू आहे.
‘मनी लाँडरिंग’ आणि हिऱ्यांमधील ‘अपव्यवहार’
एखादा गंभीर गुन्हा करून मिळवलेले धन अवैध पद्धतीने हस्तांतरित केले जाते. मूळ धन किंवा ऐवज किंवा मुद्देमाल नेमका कोठून आला आहे, याचा थांगपत्ताही लागू नये अशा पद्धतीने हे (गैर)व्यवहार चालतात. मूळ गुन्ह्य़ाची शिक्षा चुकविणे तसेच आपल्याकडील बेहिशेबी मालमत्ता वैध करण्यासाठी असे प्रकार केले जातात. जागतिक हिरे व्यापारातील गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच ‘मनी लाँडरिंग’च्या माध्यमातून दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठय़ावर लक्ष ठेवण्यासाठी सदर अहवाल सादर करण्यात आला आहे. भारतात हिऱ्यांचा व्यापार मोठय़ा प्रमाणावर चालतो. हिऱ्यांची खरेदी करणारे लोक आपल्याकडील काळा पैसा ओतण्यास तयार असतात. त्यामुळे, बाजारपेठेतील वाजवी किमतींपेक्षा हिऱ्यांच्या किमती अवाजवी फुगवून सांगितल्या जातात आणि भारतातील अनेक जण अशा चढय़ा किमतींना हे हिरे खरेदी करतात. अशा प्रकारे आपल्याकडील काळे धन वैध करण्यात येते.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2014 रोजी प्रकाशित
‘काळा पैसा’ दडविण्यासाठी ‘हिरे खरेदी’
कोटय़वधी डॉलर्सचे काळे धन ‘कायदेशीर’ करून घेण्यासाठी हिरा व्यावसायिकांची व्यापारी खाती वापरण्याचे प्रमाण वाढत आहे आणि या प्रकरणांमध्ये जगभरात आघाडीवर असलेल्या पहिल्या पाच देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.
First published on: 03-02-2014 at 01:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black money highest in diamond trade