काळा पैसा भारतात परत आणण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली असली, तरी एका आंतरराष्ट्रीय ‘थिंक टॅंक’ने केलेल्या पाहणीतून सन २०१२ मध्ये परदेशात ठेवण्यात आलेल्या काळा पैशांमध्ये जगात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. २०१२ मध्ये देशातून जवळपास सहा लाख कोटी रुपये परदेशात नेण्यात आल्याचा अंदाज या थिंक टॅंकच्या अहवालात नोंदविण्यात आला आहे. त्याचवेळी २००३ ते १२ या दहा वर्षांच्या काळात २८ लाख कोटी रुपयांचा काळा पैसा परदेशात नेण्यात आल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रिटी या थिंक टॅंकने यासंदर्भात अभ्यास करून अहवाल प्रसिद्ध केला. २०१२ मध्ये काळा पैसा परदेशात ठेवणाऱयांच्या यादीमध्ये रशियाचा पहिला क्रमांक लागतो. रशियातून १२२.८६ अब्ज डॉलरचा काळा पैसा परदेशात ठेवण्यात आला होता. तर या यादीमध्ये चीन दुसऱया क्रमांकावर आहे.
भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि करचुकवेगिरी याच कारणांमुळे या देशांमधून काळापैसा परदेशात नेण्यात आल्याची माहितीही ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रिटीच्या अहवालात देण्यात आली आहे.