राजस्थान उच्च न्यायालयाने सोमवारी १९९८ सालच्या काळवीट शिकार प्रकरणात बॉलीवूड अभिनेता सलमान खान याची निर्दोष मुक्तता केली. सलमान खान आणि अन्य सात जणांविरुद्ध काळवीट आणि चिंकाराची शिकार केल्याचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कंकणीजवळ सलमान व त्याच्या सहकाऱ्यांनी चिंकारा काळविटाची शिकार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. बिष्णोई समाजाच्या तक्रारीनंतर २ ऑक्टोबर १९९८ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १२ ऑक्टोबरला सलमानला अटकही करण्यात आली होती. मात्र, पाच दिवसांनी त्याची जामीनावर सुटका झाली होती. २००६ मध्ये वन्य प्राणी कायद्यानुसार जोधपूर येथील भवद जवळ चिंकाराची शिकार केल्या प्रकरणी सलमानला एक वर्ष कारावास आणि ५००० रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सलमान व्यतिरिक्त अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यावर देखील दोन काळविटांची शिकार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर २००७ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने घोडफार्म काळवीट शिकारप्रकरणी सलमानला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र आता या दोन्ही प्रकरणांमध्ये सलमानची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर कांकणी शिकार प्रकरणी आणि अवैध आर्म्स अॅक्टप्रकरणी अद्याप शिक्षेची सुनावणी सुरु आहे. या सुनावणीच्यावेळी सलमानची बहीण अलविरा न्यायालयाता उपस्थित होती. राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाने दिलेल्या या निर्णयामुळे सलमान खानला मोठा दिलासा मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने हिट अँड रन प्रकरणात सलमान खानला निर्दोष ठरविले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blackbuck poaching case salman khan acquitted by rajasthan high court
First published on: 25-07-2016 at 10:54 IST