परदेशातील काळा पैसा देशात आणण्याच्या वल्गना अनेकदा करण्यात आल्या असल्या तरी आता प्रत्यक्षात सायप्रस वगळता सात देशांत असा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी म्हणजे करचुकवेगिरी टाळण्यासाठी भारतीय महसूल सेवेतील सात अधिकारी नेमण्यात आले आहेत. भारताने जर्मनी, अमेरिका व फ्रान्स या देशांत सात नवीन प्राप्तिकर कार्यालये सुरू केली आहेत.
सायप्रसमध्येही असे कार्यालय सुरू करण्यात आले असले तरी त्याचे कामकाज अजून सुरू झालेले नाही. गेल्या वर्षी वर्गीकृत देश म्हणून तेथे असे कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. करांच्या प्रकरणात असहकार्याच्या प्रश्नावर भारत व सायप्रस यांच्यात चर्चा चालू आहे. सूत्रांनी सांगितले, की अर्थमंत्रालयाने अलीकडेच भारतीय महसूल सेवेतील सात अधिकाऱ्यांची नेमणूक काळय़ा पैशावर लक्ष ठेवण्यासाठी, करबुडवेगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी केली आहे. फ्रान्स, जर्मनी, जपान, नेदरलँड्स, संयुक्त अरब अमिरात, इंग्लंड व अमेरिका या देशांत अशा नेमणुका करण्यास पंतप्रधान कार्यालय व परराष्ट्र खात्याने मंजुरी दिली आहे. सरकारने इन्कम टॅक्स ओव्हरसीज युनिट्स (आयओटीसी) सुरू करण्यास मान्यता दिली असून, त्यामुळे भारतात गुंतवणुकीचा ओघ वाढेल व काळा पैसाही कमी होईल अशी कल्पना आहे.