पाकिस्तानातील दुसरे मोठे शहर लाहोर बुधवारी सकाळी शक्तीशाली बॉम्ब स्फोटाने हादरले. लाहोरमधल्या सूफी दर्ग्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात आठ पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. पीटीव्हीच्या फुटेजमध्ये घटनास्थळी गाडयांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

११ व्या शतकातील दाता दरबार दर्ग्यात महिलांसाठी असलेल्या प्रवेशद्वाराजवळ हा स्फोट झाला. दक्षिण आशियातील हा सर्वात मोठा सूफी दर्गा आहे. याआधी सुद्धा २०१० साली या दर्ग्याला लक्ष्य करण्यात आले होते. त्यावेळी आत्मघातकी हल्लेखोराने घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात ४० लोकांचा मृत्यू झाला होता.

आता या दर्ग्याजवळ मोठा बंदोबस्त असतो. सुरक्षा दलाच्या वाहनाला लक्ष्य करण्याच्या हेतूने हा आत्मघातकी हल्ला घडवण्यात आला असावा असा अंदाज स्थानिक पोलीस अधिकारी काशिफ यांनी व्यक्त केला.