शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षणामध्ये महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ) तयार करण्यात आला आहे. या नवीन आराखड्यानुसार, बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे सर्वोत्तम गुण मिळवण्याची संधी मिळेल. वर्षातून एकदाच बोर्डाची परीक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येतो, हा ताण कमी करण्यासाठी हे धोरणात्मक पाऊल उचलल्याचं शिक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी जाहीर केलं की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार, नवीन अभ्यासक्रम आराखडा (NCF) तयार केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४ साठी पाठ्यपुस्तकंही विकसित केली जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल. यातील एक भारतीय भाषा असेल. हा निर्णय केवळ भाषिक विविधता आणण्यासाठी नव्हे तर देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी घेतला आहे, असं नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगली कामगिरी करता यावी. त्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळावी, या हेतुने वर्षातून किमान दोनदा बोर्ड परीक्षा घेतल्या जातील. ज्या विषयांचा अभ्यास पूर्ण झाला आहे आणि ते परीक्षेसाठी तयार आहेत, असं जेव्हा विद्यार्थ्यांना वाटेल. तेव्हा त्याच विषयांच्या परीक्षेसाठी विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसू शकतील,” असंही नवीन अभ्यासक्रम आराखड्यात म्हटलं आहे.