अभिनेते श्रीवल्लभ व्यास यांचे रविवारी सकाळी जयपूर येथे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. जवळपास ६० पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारलेल्या व्यास यांना काही वर्षांपूर्वी एका भोजपुरी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा व्यास आणि दोन मुली असे कुटुंब आहे. २००८ नंतर व्यास रुपेरी पडद्यापासून दूर होत गेले.
व्यास यांच्या कुटुंबियांना चित्रपटसृष्टीतून आमिर खान, इमरान खान आणि मनोज वाजपेयी वगळता इतर कोणीही कठीण प्रसंगी मदतीचा हात पुढे केला नाही, अशी खंत त्यांची पत्नी शोभा व्यास यांनी व्यक्त केली. दर महिन्याला आमिर हा व्यास यांच्या कुटुंबियांना ३० हजार रुपयांची आर्थिक मदत करत होता. त्याशिवाय त्यांच्या मुलींच्या शाळेचा आणि व्यास यांच्या वैद्यकीय उपचारांसाठीचा सर्व खर्चसुद्धा आमिरच पाहात होता.
‘लगान’मध्ये व्यास यांनी साकारलेली भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्याशिवाय ‘सरफरोश’, ‘अभय’, ‘आन- मेन अॅट वर्क’, ‘शूल’, ‘नेताजी सुभाषचंद्र बोस- द फॉरगॉटन हिरो’ आणि ‘संकेत सिटी’ या चित्रपटांमध्ये काम केले होते. याशिवाय रंगभूमीवरही ते बऱ्यापैकी सक्रिय होते.
वाचा : पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल
‘लगान’ मध्ये त्यांनी साकारलेला ‘ईश्वर काका’ आणि केतन मेहतांच्या ‘सरदार’ चित्रपटामधील मोहम्मद अली जिन्ना या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.