पुणे जिल्ह्य़ातील इंदापूर तालुक्यात असलेला वालचंदनगर इंडस्ट्रीजचा प्रकल्प हा अभियांत्रिकीतील चमत्कारच आहे, तेथे १९७३ पासून भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या प्रक्षेपकांचे सुटे भाग तयार केले जात आहेत. पहिल्यांदा एसएलव्ही या प्रक्षेपकांचे सुटे भाग येथे तयार करण्यात येत होते. नंतर २००३ पासून वालचंद समूहाने जीएसएलव्ही या महाकाय प्रक्षेपकाचे बाह्य़ आवरण व बुस्टर्स तयार करण्याचे काम सुरू केले. चांद्रयान २ मधील जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपकातील बाह्य़ावरण व बुस्टर्स तयार करण्यात सहभाग असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जी.के. पिल्ले यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केली. २२ ऑक्टोबर २००८ मधील चांद्रयान १ मोहिमेतही कंपनीने अशीच भूमिका पार पाडली होती. १९७९ पासून मोटर्सची बाह्य़ावरणे इस्रोला पुरवण्याचे काम वालचंद समूहाने सुरू केले. रोहिणी, स्रॉस, आयआरएस, जीसॅट व इतर उपग्रह पाठवण्यासाठी वापरलेल्या प्रक्षेपकात वालचंद समूहाचे मोठे योगदान आहे.  आतापर्यंत कंपनीने पीएसएलव्ही व जीएसएलव्ही मार्क २, ३ साठी १४१ स्ट्रॅप बुस्टर्स तयार केले असून १५१ कोअर बुस्टर्स  तयार केले आहेत. जीएसएलव्ही मार्क ३ या आताचे चांद्रयान २ सोडणाऱ्या प्रक्षेपकाचे १६ कोअर बुस्टर्स वालचंद समूहाने तयार केले. इतर हार्डवेअर, नॉझल, टँक, एंड रिंग हे सगळे भाग येथे तयार करण्यात आले आहे. दर वर्षी जीएसएलव्हीच्या चार उड्डाणांना कंपनी सुटे भाग पुरवत असते. वालचंद उद्योग  समूहाने अवकाश क्षेत्रात इस्रोशी सहकार्य करून देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे असे पिल्ले यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Booster of walchand to isro campaign abn
First published on: 23-07-2019 at 01:16 IST