Brazil President call PM Modi amid Donald Trump Tariff on india : रशियाकडून तेल खरेदी करत असल्याबद्दल दंड म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादले आहे. यामुळे भारतावरील आयात शुल्काचा आकडा हा ५० टक्क्यांवर गेला आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुइज इनासिओ लूला दा सिल्वा यांनी फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझील आणि भारत या दोन देशांवर ५० टक्के निर्यात शुल्क लादले आहे, यामुळे या दोन नेत्यांमध्ये झालेल्या संवादाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.

नेमकी काय झाली चर्चा?

पंतप्रधान मोदींनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “राष्ट्राध्यक्ष लूला यांच्याबरोबर चांगली चर्चा झाली. माझा ब्राझीलचा दौरा स्मरणीय आणि अर्थपूर्ण बनवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानले. व्यापार, उर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण, आरोग्य आणि इतरह अनेक क्षेत्रात आपल्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ग्लोबल साऊथ देशांमधील एक भक्कम लोक-केंद्रीत भागीदारी ही सर्वांसाठीच फायदेशीर आहे,” असे पंतप्रधान मोदी एक्स पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

अधिकृत निवेदनानुसार, पीएम मोदी यांनी, गेल्या महिन्यात त्यांनी केलेल्या ब्राझील दौऱ्याची आठवण करून दिली, या दौऱ्यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यापार, तंत्रज्ञान, उर्जा, संरक्षण, शेती, आरोग्या आणि लोकांमधील संबंध यामध्ये सहकार्य आणखी दृढ करण्याच्या रुपरेषेवर सहमती दर्शवली होती.

या चर्चेच्या माध्यमातून त्यांनी भारत-ब्राझील यांच्यातील धोरणात्मक भागीदारीली नवीन उंचीवर नेण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या हिताच्या वेगवेगळ्या प्रादेशिक आणि जागतीक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली, असेही निवेदनात म्हटले आहे.

लूला यांनी ते पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी बोलतील असे सांगितल्याच्या दुसऱ्याच दिवशी फोनवरून ही चर्चा झाली आहे. यावेळी लूला यांनी ते वाटाघाटींसाठी ट्रम्प यांना फोन करणार नसल्याचे म्हटले होते. “मी त्यांना बोलवेन, मी शी जिनपिंग यांना फोन करेन, मी पंतप्रधान मोदी यांना फोन करेन. मी फक्त पुतिन यांना फोन करणार नाही, कारण पुतिन हे सध्या प्रवास करू शकत नाहीत,” असे ते म्हणाले होते.