साहसाची विलक्षण आवड असलेल्या एका ब्रिटिश महिलेने अतिशय खडतर अशा अंटाक्र्टिका प्रदेशातून दहा दिवस सायकल चालवत दक्षिण ध्रूव सर केला आहे. ८०० किमीचे अंतर सायकलवरून पार करताना दोन पुरुष स्पर्धकांना मागे टाकत दक्षिण ध्रुव पादाक्रांत करणारी ही महिला पहिली व्यक्ती ठरली आहे.
मारिया लेजरस्टॅम (३५) असे या साहसी महिलेचे नाव असून अतिशय प्रतिकूल वातावरणावर मात करीत अडचणीतून मार्ग काढत या महिलेने हे यश मिळवले आहे. आपल्या यशामागील घेतलेल्या मेहनतीबाबत मारिया यांनी सांगितले की, अंटाक्र्टिकामधील वातावरणात सायकल चालविताना अधिक त्रास होऊ नये म्हणून मी रोज दोन ते तीन तास उपाशीपोटी सराव करीत असे. त्या वेळी शरीरातील चरबीऐवजी काबरेदके टिकवण्याबाबत शरीराला सवय लावली. त्यामुळे माझे शरीर अधिक कार्यक्षम झाले आणि मी यशाची मानकरी ठरल्याचे सांगितले.
व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करणाऱ्या आपल्या मुलीच्या यशाबद्दल आई अँड्रियन लेजरस्टॅम यांनी तिचे कौतुक केले. योग्य नियोजनासह शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा अधिक कणखरपणा आणि संपूर्ण झोकून देण्याच्या वृत्तीमुळे तिला हे यश मिळाल्याचे आईने म्हटले. १२ वर्षांची असल्यापासून मारियाला साहसाची इच्छा आहे. आपल्याला अंतराळवीर व्हायची इच्छा असल्याचे तिने जाहीर केले होते. आपल्या साहसी प्रवृत्तीने तिला हवे तसे यश तिने मिळवल्याचेही त्या
म्हणाल्या.
इतर स्पर्धक अमेरिकेच्या डॅनियल बर्टन आणि स्पानिआर्ड जुआन मेनेंडेज ग्रॅनाडोस यांच्या तुलनेत मारियाने १६ डिसेंबर रोजी रशियाच्या नोवो हवाई तळावरून अतिशय खडतर मार्गाने आपल्या परिक्रमेला सुरुवात केली. तसेच दोघांवर आघाडीही मिळवली, असे बीबीसीने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, १९११ मध्ये नॉर्वेच्या रोआल्ड अ‍ॅम्युंडनस यांनी दोन मीटर लांबीच्या स्कीइंगवरून दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा मान मिळवला होता. या मोहिमेदरम्यान त्यांच्या सहकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.