British MP Robert Jenrick on Indian Locality: ब्रिटिश खासदार रॉबर्ट जेनरिक यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानावर सध्या ब्रिटनमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. ब्रिटनच्या बर्मिंगहॅममधील हँड्सवर्थ या भागात मोठ्या प्रमाणावर भारतीय व पाकिस्तानी नागरिकांची वस्ती आहे. मात्र, या परिसराबाबत रॉबर्ड जेनरिक यांनी मंगळवारी दी टेलिग्राफवरील एका पॉडकास्टमध्ये वादग्रस्त विधान केलं आहे. विशेष म्हणजे, याआधीही काही महिन्यांपूर्वी त्यांनी असंच विधान केलं होतं. आता पुन्हा एकदा आपल्या विधानाचं त्यांनी समर्थन केलं आहे. त्यांच्या या विधानावर ब्रिटनमध्येच संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

काय म्हणाले रॉबर्ट जेनरिक?

रॉबर्ट जेनरिक यांनी पहिल्यांदा यावर्षी मार्च महिन्यात हे विधान केलं होतं. या परिसरातील स्वच्छतेच्या मुद्द्यावर बातमीसंदर्भातील एक व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी ते गेले होते. त्यानंतर कॉन्झर्व्हेटिव्ह असोसिएशनने आयोजित केलेल्या डिनरवेळी त्यांनी ‘हा भाग एखाद्या झोपडपट्टीसारखा दिसतो’ अशा आशयाचं विधान केल होतं.

“हा भाग एखाद्या झोपडपट्टीसारखा दिसतो. मला ज्या देशाची अपेक्षा आहे, तो देश असा नाही”, असं जेनरिक म्हणाले होते. या विधानासंदर्भात त्यांनी मंगळवारी पॉडकास्टमध्ये स्पष्टीकरण देत समर्थन केलं आहे.

“इथे असे अनेक छोटे छोटे भाग आणि काही तर शहरं अशी आहेत जी मूळ ब्रिटनच्या वातावरणापासून वेगळी पडली आहेत. त्यामुळे उगीच वर्णद्वेषाचा ठपका बसेल या भीतीपोटी लोकांना अशा गोष्टींबाबत बोलण्यापासून रोखलं जाता कामा नये. तो भाग खरंच एखाद्या झोपडपट्टीसारखा दिसत होता. तिथली परिस्थिती धक्कादायक होती. कोणत्याही झोपडपट्टीच्या ठिकाणी मी इतक्या जवळ पहिल्यांदाच गेलो होतो. मी आजपर्यंत पाहिलेल्या अत्यंत वाईट पद्धतीने वसलेल्या भागांपैकी तो एक भाग होता. विशेष म्हणजे मला तिथे एकही ब्रिटिश व्यक्ती (‘व्हाईट फेस’) दिसली नाही. मला असा देश अपेक्षित नाही”, अशा शब्दांत रॉबर्ट जेनरिक यांनी आपल्या विधानामागची भूमिका मांडली आहे.

रॉबर्ट जेनरिक यांना कुणाचं समर्थन?

दरम्यान, ब्रिटनमध कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या काही वरीष्ठ नेत्यांनी जेनरिक यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. केमी बाडेनॉक म्हणाले की जेनरिक यांच्या विधानात काहीही चुकीचं नव्हतं. तसेच, ब्रिटनमध्ये काही मंडळी बेकायदेशीर स्थलांतरितांना आश्रय देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही ते म्हणाले. शिवाय, या मुद्द्यांवर बोलताना आपण कचरणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काही माजी नेत्यांनी केला जेनरिक यांचा निषेध

एकीकडे कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे काही आजी नेते रॉबर्ट जेनरिक यांच्या विधानाचं समर्थन करत असताना काही माजी नेत्यांनी त्यावर टीका केली आहे. मायकल हेझलटाईन यांनी जेनरिक यांच्या विधानावरून बाडेनॉक यांचा समाचार घेतला आहे. स्थलांतरितांवर असा प्रकारे टीका करून सत्ता मिळवणं ही काही कन्झर्व्हेटिव्ह पक्षाची पद्धत नाही, असं ते म्हणालेत. तसेच, अशा विधानांमुळे समाजात दुफळी माजू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

‘बिशप ऑफ बर्मिंगहॅम’ मायकल वोलँड यांनी रॉबर्ट जेनरिक यांचं विधान पूर्णपणे चुकीचं असून आपण त्यामुळे निराश झालो असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी जेनरिक यांना पत्र लिहून नाराजी कळवली आहे. “अशा प्रकारच्या विधानांमुळे समाजात मतभेद निर्माण होतील. कलुषित राष्ट्रवादाला यामुळे खतपाणी मिळेल. तुमच्या विधानांमुळे भेदभावापेक्षा एकोप्याला कशी चालना मिळेल, याचा तुम्ही विचार करायला हवा”, असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.