Radhika Yadav Murder Case Update : हरियाणामधील टेनिसपटू राधिका यादव हिची हत्या वडील दीपक यादवने केल्याची घटना नुकतीच घडली. गोळ्या झाडून राधिकाची हत्या केल्याच्या घटनेनंतर गुरुग्राममध्ये मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर आरोपी दीपक यादवला पोलिसांनी अटक केलं असून न्यायालयाने आरोपीला कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
राधिकाच्या हत्या प्रकरणानंतर आरोपी दीपक यादवने स्वतःच आपला गुन्हा कबूल केला आहे. आता दीपकबाबत बोलताना राधिका यादवच्या काकाने सांगितलं की, आरोपीने राधिकावर पाच गोळ्या झाडून तिचा जीव घेतल्याबद्दल त्याला फाशी देण्याची मागणी केली आहे. राधिकाची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दीपक यादवने दिली आहे. तसेच जर फाशी देण्याचा काही नियम असेल तर या गुन्ह्यासाठी फाशी द्यावी असंही आरोपीने म्हटलं आहे, अशी माहिती विजय यादव यांनी सांगितली आहे.
दरम्यान, विजय यादव यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं की, “आरोपी दीपक यादवने राधिकाची हत्या केल्यानंतर कुटुंबीयांना सांगताना तो म्हणाला की, ‘भाई, मैने कन्या वध कर दिया. मुझे मार दो’. पण त्याने हत्येचं कारण सांगितलं नाही. तसेच आरोपी दीपकने पोलीस ठाण्यातही असं सांगितलं की, जर फाशी देण्याचा नियम असेल तर फाशी द्या”, अशी माहिती विजय यादव यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स नाऊने दिलं आहे.
राधिकाच्या हत्येच्या कटाबद्दल आईला किती माहिती होती?
राधिका यादव या २५ वर्षीय टेनिसपटूच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांकडून तपास केला जात आहे. राधिकाची तिच्यात वडीलांनी घरात गोळ्या घालून हत्या केली असून आता पोलीस तिच्या आईला या हत्येबाबत कितपत माहिती होती याचा तपास करत आहेत. या प्रकरणातील आरोपी दीपक यादवने पोलिसांच्या चौकशीत मुलीच्या हत्येची योजना बनवल्याचे कबूल केले, इतकेच नाही तर मुलीला गोळ्या घालण्याच्या आधी त्याने मुलाला दूध घेऊन येण्यासाठी घराबाहेर पाठवलं होतं. दरम्यान दीपक यादव याची पत्नी आणि पीडितेची आई मंजू यादव यांनी पोलिसांना जबाब देण्यास नकार दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, हत्येच्या वेळी ती फ्लॅटमध्ये उपस्थित होती, पण तिला ताप आला होता आणि तिने काहीही पाहिले नाही.
दीपक यादवला पोलीस कोठडी
या प्रकरणातील आरोपी दीपक यादवला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने पोलिसांना चौकशीसाठी वेळ मिळावा यासाठी यादवला एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सांगितले की मुलगी जे काही करेल त्या सर्व गोष्टीत तिला पाठिंबा दिल्याने त्याच्या मूळ गावातील गावकरी त्याला टोमणे मारत होते. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, गावकरी त्याला ‘गिरा हुआ बाप’ असेही म्हणत असत. या टोमण्यांमुळे दीपक यादव संतापला आणि त्याने राधिका यादवला तिची टेनिस अकादमी बंद करण्यास सांगितले, ज्यासाठी त्यानेच मुलीला पैसे दिले होते. पण राधिकाने ही अकादमी बंद करण्यास नकार दिला. त्यानंतर दीपक यादवने राधिकाची हत्या केली.