Brutal Murder of Woman : सोशल मीडियामुळे जुळलेल्या एका नात्याला विरोध दर्शवणाऱ्या महिलेचा अत्यंत भयंकर शेवट झाला आहे. ३९ वर्षांच्या एका महिलेची हत्या तिच्या अल्पवयीन मुलीने आणि त्या मुलीच्या बॉयफ्रेंडने १९ वर्षीय बॉयफ्रेंडने तसंच त्याच्या भावाने केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीने तिच्या बॉयफ्रेंडला घरी बोलवलं. तो त्याच्या भावाला घेऊन मुलीच्या घरी आला. त्याने त्याच्या भावाने या महिलेचा गळा आवळला त्यावेळी या महिलेची शुद्ध हरपली. त्या दोघांनाही वाटलं की तिचा मृत्यू झाला त्यामुळे ते तिथून बाहेर गेले. काही वेळाने अल्पवयीन मुलीला लक्षात आलं की तिच्या आईचा श्वास सुरु आहे. तिने पुन्हा बॉयफ्रेंडला फोन केला ज्यानंतर तिचा बॉयफ्रेंड परत आला आणि त्याने या मुलीच्या आईवर हातोडीने वार केले आणि तिला ठार केलं. आई मुलीच्या नात्याला कलंक लावणारी ही घटना हैदराबादमध्ये घडली.
पोलिसांनी या घटनेबाबत काय सांगितलं?
या घटनेबाबत पोलीस उपायुक्त पी. नरेश रेड्डी यांनी माहिती दिली. “अल्पवयीन मुलीने आणि तिच्या १९ वर्षीय बॉयफ्रेंडने महिलेची हत्या केली. या मुलीचा बॉयफ्रेंड डीजे म्हणून काम करतो. त्याचं नाव शिवा असं आहे. तो नालगोंडा जिल्ह्यातील गावात राहतो. महिलेच्या मुलीची आणि शिवाची ओळख आठ महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर झाली. त्यानंतर ते एकमेकांना भेटले आणि त्यांच्या गाठीभेटी वाढू लागल्या. आपल्या अल्पवयीन मुलीच्या प्रेमसंबंधांबाबत आईला समजलं. तेव्हा तिने याबाबत मुलीला समज दिली. मात्र १९ जून रोजी या महिलेची अल्पवयीन मुलगी शिवासह पळून गेली होती. ज्यानंतर या महिलेने आपल्या मुलीसंबंधीची आणि शिवाची तक्रार पोलिसात दिली होती. ज्यानंतर ही घटना घडली.”
२३ जून रोजी महिलेची हत्या नेमकी कशी झाली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी जेव्हा घरी परत आली तेव्हा तिचा आणि तिच्या आईचा वाद झाला होता. २३ जूनला या अल्पवयीन मुलीने शिवाला फोन करुन हे सांगितलं की तिची आई आपल्या प्रेमाला आणि नात्याला विरोध दर्शवते आहे. २३ जूनच्या रात्री शिवा आणि त्याचा भाऊ यशवंत हे दोघंही या मुलीच्या घरी आले. या मुलीने ठरल्याप्रमाणे घराचं दार उघडंच ठेवलं होतं. ओढणीने आणि साडीने या महिलेचा गळा आवळण्यात आला. ज्यानंतर या महिलेची शुद्ध हरपली. ही महिला मेली आहे असं समजून शिवा आणि यशवंत तिथून निघून गेले. ज्यानंतर आई श्वास घेते आहे असं अल्पवयीन मुलीच्या लक्षात आलं. तिने पुन्हा एकदा शिवाला फोन केला. शिवा आणि यशवंत दोघंही परत आले. त्यांनी या महिलेवर हातोडीचे वार केले. तिच्या डोक्यावर आणि नाकावर हे वार करण्यात आले जे इतके जबरदस्त होते की महिलेचा जागीच मृत्यू झाला अशी माहितीही पोलिसांनी दिली. अशा पद्धतीने आईची हत्या तिच्या मुलीनेच घडवून आणली.