भारत बंद दरम्यान, दलित संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या हिंसाचारामागे बहुजन समाज पार्टीच्या आमदाराचा हात असल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. योगेश वर्मा असे या आमदाराचे नाव असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशात ९ आंदोलकांचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. तर ७५ लोक जखमी झाले आहेत. तसेच ४ नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.
याप्रकरणी मेरठचे वरिष्ठ पोलिस अधिकारी मंजिल सैनी यांनी सांगितले की, या हिंसाचाराचा कट रचण्यात आमदार योगेश वर्मा यांचा हात आहे. मेरठ हे उत्तर प्रदेशातील एक महत्वाचे शहर असून येथेही दलित संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. दरम्यान, पोलिसांसोबत आंदोलनकर्त्यांचीही वादावादी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ९ लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये ४५ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.
मंजिल सैनी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आंदोलकांवर नियंत्रणासाठी पोलिसांना खुली परवानगी दिली होती. या हिंसाचारात सहभागी २०० लोकांनाही यावेळी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये खटला दाखल करण्यात आला आहे. यामध्ये योगेश शर्मा यांचाही समावेश आहे. त्यांच्यावर हत्या केल्यासह हिंसाचार पसरवल्याचा खटला दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बसपा सुप्रिमो मायावती यांनी अॅट्रॉसिटी कायद्याला कथित स्वरुपात शिथिल करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरोधात आपल्या पक्षाचा पाठींबा दर्शवला होता. तसेच काही असामाजिक घटकांनी हा हिंसाचार घडवला असून त्यामुळे सार्वजनिक संपत्तीची हानी झाल्याचा आरोप केला होता. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा मोदी सरकारने कोर्टात मांडलेल्या चुकीच्या भुमिकेचा परिणाम होता. त्यामुळे हिंसा घडवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी. मात्र, राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरोधात आंदोलन करणाऱ्या निरपराध लोकांना सतावले जाऊ नये, असेही मायावती यांनी म्हटले होते.