उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तालिबानवर निशाणा साधला आहे. २० वर्षांपूर्वी तालिबानने गौतम बुद्धांचा पुतळा पाडला होता. त्यावरून योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये बोलताना टीका केली आहे. “गौतम बुद्धांनी कधीही जगावर युद्ध लादले नाही, ते मानवतेचे प्रेरणास्थान आणि भक्तीचे केंद्र आहेत. परंतु कोणत्याही भारतीयाने किंवा जगात शांतता आणि सौहार्दाचे समर्थन करणार्‍या कोणत्याही व्यक्तीने भगवान बुद्धांचा पुतळा तालिबानने उद्ध्वस्त केल्याचे दृश्य विसरू नये,” असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

२० वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातील बामियानमध्ये गौतम बुद्धांची अडीच हजार वर्षे जुनी मूर्ती तालिबानने उद्ध्वस्त केली तेव्हाची दृश्ये तुम्ही पाहिलीच असतील. तालिबानचा तो रानटीपणा जगानेही पाहिला होता. त्यानंतर काही दिवसांनी अमेरिकेने तिथे बॉम्ब टाकले आणि तालिबानी मारले जाऊ लागले, त्यांनी गौतम बुद्धांच्या पुतळ्यासोबत जे केले त्याची शिक्षा देव त्यांना देत आहे,  असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊमध्ये बोलताना म्हणाले.

भारतीय इतिहासाकडे लक्ष वेधत ते म्हणाले, “इतिहासाचा विपर्यास कसा होतो! इतिहासाने चंद्रगुप्त मौर्याला महान म्हटले नाही, कोणाला महान म्हटले? जो त्याच्यापासून हरला त्या अलेक्झांडरला महान म्हणतात. देशाची फसवणूक झाली आहे. मात्र, इतिहासकार यावर मौन बाळगून आहेत,” असंही योगी म्हणाले.