‘सीए’च्या परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने उद्योगपती अनिल अंबानी, बॉलिवूडचा अभिनेता शाहरूख खान, सलमान खान, भारताच्या क्रिकेट संघाचा कप्तान महेंद्र स़िंग धोनी आणि महान फलंदाज सचिन तेंडूलकर यांची आयकर भरणा खाती हॅक केली असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबई पोलिस गुन्हे अण्वेषन विभागाने गुरूवारी या चार्टर्ड अकौंटन्सीचा(सीए) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले.
या महिन्याच्या सुरूवातीलाच हैद्राबाद येथे देखील एका ‘सीए’चीच तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने उद्योगपती अनिल अंबानी यांचे आयकर भरणा खाते हॅक केले होते.
या विद्यार्थ्याने जर या महत्त्वाच्या व्यक्तिंची आयकर भरणा खाती हॅक केल्याचे सिध्द झाल्यास देशातील अकौंटीगचे नियमन करणारी संस्था ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडिया’ (आयसीएआय) या विद्यार्थ्याविरोधामध्ये कठोर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले. या विद्यार्थ्याची आर्टीकलशिप रद्द करून ‘सीए’च्या अभ्यासावर बंदी घालण्यात येईल असे ‘आयसीएआय’ कडून सांगण्यात आले.    
“आम्ही याआधी अनिल अंबानी यांचे आयकर खाते हॅक करणाऱ्या ‘सीए’ची तयारी करणाऱ्या हैद्राबादमधील विद्यार्थ्याविरोधामध्ये एका चौकशी समितीची स्थापना केली आहे. बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेट पटू यांची आयकर खाती हॅक करणाऱ्या या विद्यार्थ्याविरोधामध्ये शुक्रवारी आम्ही तातडीने एक चौकशी समिती स्थापन करणार आहोत,” असे ‘आयसीएआय’चे अध्यक्ष  सुबोध अगरवाल यांनी सांगितले.
या घटनांनंतर एक पत्रक काढून अशा बेकायदेशीर प्रकारानंतर विद्यार्थ्यांना कोणत्या परिणामांना सामोरे जावे लागणार असल्याचे प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे अगरवाल म्हणाले.
“या प्रकरणांवरून शासकीय यंत्रणा देखील  कमजोर असल्याचे समोर आले आहे. मी या बाबी लवकरच शासनापर्यंत घेवून जाणार आहे,” असे अगरवाल पुढे म्हणाले.