केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपाचे एक ज्येष्ठ नेते असून ज्येष्ठ केंद्रीय मंत्रीही आहेत. केंद्रातील एक कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. सुरुवातीच्या काळापासूनच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या विचारसरणीनुसार आपली धोरणं ठरवली आहेत. मात्र, नितीन गडकरींनाही कधीकाळी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर मिळाली होती! खुद्द नितीन गडकरींनीच यासंदर्भात ‘इंडियन एक्स्प्रेस अड्डा’मध्ये बोलताना माहिती दिली आहे. यावेळी बोलताना गडकरींनी आरएसएसच्या बदलत्या स्वरुपाविषयीही भाष्य केलं.
आरएसएसमधील नव्या पिढीमुळे काय बदल जाणवतोय?
या कार्यक्रमात नितीन गडकरींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बदलत्या स्वरुपाविषयी विचारणा केली असता त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “आधी हाफ पँट होती. आता फुलपँट आलीये. मला वाटतं की वेळेनुसार घरांमध्ये बदल होतो. परिस्थितीमधील बदलानुसार समाजातही बदल होतो. बदल ही साहजिक बाब आहे. फक्त हा बदल होताना आपल्या देशभक्तीच्या मूळ गाभ्याशी तडजोड होता कामा नये. आम्ही जे काल होतो, ते आज आहोत. आज आहोत तेच उद्याही राहणार आहोत. आमची उद्दिष्ट, तत्वांशी आम्ही कधीच तडजोड करत नाही. आम्ही काही व्यावसायिक राजकारणी नाहीत”, असं नितीन गडकरी म्हणाले.
नागपूरमधील ‘तो’ किस्सा!
दरम्यान, यावेळी बोलताना नितीन गडकरींनी नागपूरमध्ये घडलेला एक किस्सा सांगितला. “मला आठवतंय, मी जेव्हा नागपूरमध्ये होतो, तेव्हा डॉक्टर श्रीकांत म्हणून माझे खूप चांगले मित्र होते. ते फार विद्वान होते. त्यांनी खूप साऱ्या पदव्या घेतल्या होत्या. ते काँग्रेसचे होते. त्यांनी मला एकदा सांगितलं की नितीन तू खरंच खूप चांगला राजकारणी आहेस. त्यामुळे तू चुकीच्या पक्षात आहेस. आयुष्यात तू इथे कधीच काही करू शकणार नाहीस. त्यामुळे तू काँग्रेसमध्ये ये. मी त्यांना म्हणालो की मी विहिरीत उडी मारेन, पण काँग्रेसमध्ये येणार नाही. कारण मला मनापासून जे वाटेल, ते मी करेन नाहीतर नाही करणार”, असं गडकरी म्हणाले.
Video: “जसे प्रमोद महाजन स्डेडियममधून बाहेर पडले, सामना फिरला आणि…”, नितीन गडकरींनी सांगितली ‘ती’ आठवण!
Video: कितीही रस्ते बनवले तरी वाहतुकीची समस्या कमी का होत नाही? गडकरींनी सांगितला उपाय; म्हणाले…!
“मी कधी आयुष्यात कल्पना केली नव्हती की मी मंत्री बनेन. १९७५ सालानंतर मी जेव्हा भाजपाचा जनरल सेक्रेटरी झालो, तेव्हा ज्यांचे ज्यांचे डिपॉझिट वाचायचे, त्यांचा सत्कार केला जायचा. आता आम्ही जिंकू लागलो आहोत. त्यामुळे परिस्थिती बदलत असते. एक काळ असा होता, जेव्हा लोकांमध्ये आमची ओळख तेवढी सक्षम नव्हती. प्रतिमा विरुद्ध वास्तव अशी आमची परिस्थिती होती. आम्ही जे नव्हतो, तशी आमची प्रतिमा होती. अजूनही आहे. आमच्यातच काही कमतरता असेल की आम्ही प्रतिमा सुधारू शकलो नाही. पण आता ती सुधारूनही बराच काळ लोटला आहे”, असंही ते म्हणाले.