पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संसद अधिवेशनानंतर म्हणजे १२ एप्रिलनंतर हे बदल होण्याची शक्यता आहे. अनेक महत्वाची पदे रिक्त झाल्याने आणि काही नव्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये घेतले जाऊ शकतात, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालय आणि अर्थमंत्रालय या दोन्ही महत्वाच्या जबाबदारीमुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवू शकतात.
२०१४ मध्ये भाजपच्या विजयानंतर संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी जेटली यांच्याकडेच होती. त्यानंतर पर्रिकर यांना गोव्यावरून बोलवून त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. एकीकडे जेटलींना अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सांभाळायची आहे. तर संरक्षण मंत्री या नात्याने या क्षेत्रासाठी आर्थिक तरतुदींची मागणीही करायची आहे. त्यामुळे सध्या ते विचित्र अवस्थेत फसले गेले आहेत.

सुषमा स्वराज यांच्या आजारपणामुळे विदेश मंत्रालयाची जबाबदारीही दुसऱ्याकडे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी तीन महिन्यानंतर सुषमा स्वराज लोकसभेत परतल्या. त्यांनी सुमारे १५ मिनिटे भाषण केले आणि या संपूर्ण भाषण त्यांनी उभे राहूनच दिले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या फेरबदलात काही नवे चेहरे जोडले जाऊ शकतात. काही मंत्र्यांना बढतीही मिळू शकते. नव्या चेहऱ्यांना घेऊन मंत्रालय आणखी मजबूत करण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. लवकरच मोदी सरकार तीन वर्षे पूर्ण करणार आहे.
मोदी सरकारने गेल्यावर्षी जुलै महिन्यात कॅबिनेटचा विस्तार केला होता. मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आले. त्यांच्या जागेवर प्रकाश जावडेकर यांना मनुष्यबळ विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. व्यंकय्या नायडू यांना जेटली यांच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर पत्रकारितेतून राजकारणात आलेले एम. जे. अकबर यांना विदेश राज्यमंत्री पद देण्यात आले होते.