कॅनडात जाणाऱ्या भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. कॅनडाने भारतीय प्रवाशांसाठीची बंदीची मुदत आणखी वाढवली आहे. कॅनडाने भारतातील उड्डाणे २१ सप्टेंबरर्यंत स्थगित केली आहेत. करोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन कॅनडाने हा निर्णय घेतला आहे असे सांगण्यात येत आहे. कॅनडाने आपल्या नागरिकांना पुढील सूचना येईपर्यंत करोनाचा धोका लक्षात घेऊन देशाबाहेर प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

कॅनडाच्या परिवहन मंत्रालयाच्या हवाल्याने वृत्तसंस्था रॉयटर्सला मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडाने भारतातून येणाऱ्या प्रवासी उड्डाणांवर लादलेली बंदी वाढवण्यात आली आहे. कॅनडाने भारतातून येणाऱ्या प्रवासी उड्डाणांवरील बंदी २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. कॅनडाने लादलेली ही बंदी २१ ऑगस्ट रोजी संपणार होती, पण तेथील सरकारने आता ही बंदी २१ सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे.

करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २२ एप्रिल रोजी कॅनडामध्ये पहिल्यांदा बंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर ही बंदी पाचव्यांदा वाढवण्यात आली आहे. १९ जुलै रोजी कॅनेडियन सरकारने २१ ऑगस्ट पर्यंत परदेशी उड्डाणांवरील बंदी वाढवली होती. या व्यतिरिक्त, भारतातून कॅनडाला जाणाऱ्या लोकांना तिसऱ्या देशात करोनाची मोलेक्युलर चाचणी करावी लागत आहे. तो नकारात्मक असेल तरच त्याला कॅनडामध्ये प्रवेश दिला जात आहे. जर आधी प्रवास करणाऱ्यांना करोना झाला असेल तर त्यांना त्यांच्या प्रवासाच्या १४ ते ९० दिवस आधी चाचणी घ्यावी लागत आहे आणि हे तिसऱ्या देशात करावे लागत आहे.

यापूर्वी, कॅनडाने करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमधल्या थेट उड्डाणांवर बंदी घातली होती. आता ही बंदी पुन्हा वाढवण्यात आली आहे. कार्गो विमानांना आवश्यक वस्तू जसे की लस आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांना परवानगी देण्यात आली आहे.