पीटीआय, नवी दिल्ली

कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री अनिता आनंद यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी कॅनडाबरोबरील व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्राचे महत्त्व या भेटीतील चर्चेत अधोरेखित केले.

या वर्षी जून महिन्यात कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याबरोबर झालेल्या भेटीच्या आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला. कॅनडाचे पंतप्रधान कार्नी यांना मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. अनिता आनंद यांचे नवी दिल्लीत रविवारी सायंकाळी आगमन झाले. भारतानंतर त्या चीन आणि सिंगापूरचाही दौरा करणार आहेत.

परराष्ट्रमंत्री जयशंकर-आनंद यांची भेट

‘भारत आणि कॅनडाने व्यापार, गुंतवणूक, महत्त्वाची खनिजे, ऊर्जा, नागरी आण्विक सहकार्य या क्षेत्रांतील भागीदारीसाठी महत्त्वाकांक्षी आराखडा केला आहे,’ असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी केले. कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री अनिता आनंद यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली.