नवी दिल्ली : “जे वैचारिक लढाईत हरत आहेत आणि ज्यांची चोरी पकडली जात आहे, ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्याचे कारस्थान रचत आहेत” असा आरोप काँग्रेसने भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर सोमवारी केला. केरळ भाजप नेत्याने राहुल गांधी यांना वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान दिलेली धमकी रक्त गोठवणारी आणि भयंकर असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

भाजप नेते आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी केरळ अध्यक्ष प्रिंटू महादेवन यांनी एका मल्याळी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान “राहुल गांधी यांना छातीत गोळ्या घालून मारले जाईल,” असे विधान केले होते. त्याबद्दल काँग्रेसचे सरचिटणीस (संघटना) के सी वेणुगोपाल हे सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “टीव्हीवरील चर्चेदरम्यान एका भाजप प्रवक्त्याने उघड धमकी दिली आहे. मी अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. आम्हाला असे वाटते की हा मोठ्या कटाचा भाग आहे. मला गृहमंत्र्यांकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.”

राहुल गांधी यांच्या सुरक्षेवरून राजकारण केले जात आहे, अशी टीका काँग्रेसचे माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी केली. आधी ‘सीआरपीएफ’ने राहुल गांधींच्या सुरक्षेवरून मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेले पत्र माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आले. आता भाजपचे प्रवक्ते त्यांना छातीत गोळ्या मारण्याची भाषा करत आहेत. राहुल यांच्या सुरक्षेवरून राजकारण का केले जात आहे आणि अशी वातावरणनिर्मिती का केली जात आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला.

हे लोक वैचारिक लढाई हरत आहेत. आधी तुम्ही शिवीगाळ करून राहुल गांधी यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला आणि आता त्यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली जात आहे. – पवन खेरा, काँग्रेस नेते

धमकी देणाऱ्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल

थ्रिसूर (केरळ) : राहुल गांधी यांच्या छातीवर गोळ्या झाडल्या जातील, असे आक्षेपार्ह विधान करणारे भाजप नेते प्रिंटू महादेवन यांच्याविरोधात केरळ पोलिसांनी सोमवारी गुन्हा नोंदवला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्रीकुमार सी सी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पेरामंगलम पोलिसांनी ही कारवाई केली. प्रिंटू महादेवन हे एका मल्याळी वृत्तवाहिनीवर २६ सप्टेंबरला बांगलादेळ आणि नेपाळमधील निदर्शनांबद्दल आयोजित चर्चेमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले होते. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला.