पीटीआय, बिलासपूर: काँग्रेस सत्तेत आल्यास जातीनिहाय जनगणना केली जाईल, असे आश्वासन पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधील बिलासपूर येथे एका कार्यक्रमात दिले. जातीनिहाय जनगणनेसारख्या उपक्रमांमुळे इतर मागासवर्गीय, दलित, आदिवासी आणि महिला या घटकांना सत्तेमध्ये सहभागी होता येईल असे ते म्हणाले.

बिलासपूर जिल्ह्यातील पारसडा (साकरी) या गावामध्ये राज्य सरकारच्या ‘आवास न्याय संमेलन’ या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. नरेंद्र मोदी सरकारला जातीनिहाय जनगणनेची भीती वाटते का, असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच काँग्रेस सत्तेत असताना करण्यात आलेल्या जातीनिहाय जनगणनेचे तपशील प्रसिद्ध का केले नाहीत असा प्रश्नही त्यांनी विचारला. केंद्र सरकारकडे हा अहवाल आहे पण मोदी यांना तो प्रसिद्ध करण्याची इच्छा नाही असे राहुल म्हणाले. काँग्रेस सत्तेत असताना गरीब आणि गरजू लोकांना लाभ होतो तर भाजप सत्तेत असताना अदानींना बंदरे, विमानतळे आणि रेल्वेची कंत्राटे मिळतात असा दावा त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मोदी सरकारचे प्राधान्यक्रम चुकीचे’

केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेचे अव्यवस्थापन केले असून त्यांचे प्राधान्यक्रम चुकले आहेत असा आरोप काँग्रेसने सोमवारी केला. वाढती महागाई आणि घटते वेतन यामुळे लोकांना बचत करणे अवघड होत असल्याची टीका पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली. अनेक अर्थतज्ज्ञांनी ही समस्या उपस्थित केली आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये पहिल्यांदाच गृहकर्जाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे असे रमेश ‘एक्स’ या समाजमाध्यमावर लिहिले आहे.